प्रत्येक घरात असा भाऊ असतोच असे नाही; सुप्रिया सुळेंचा संसदेत अजितदादांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 07:59 AM2023-09-21T07:59:56+5:302023-09-21T08:00:23+5:30
महिला आरक्षण विधेयकावरील भाषणादरम्यान ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आठवण काढली
नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेल्या महिला आरक्षणाच्या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बुधवारी जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा जाहीर केला. परंतु, लोकसभेतल्या सलग दुसऱ्या भाषणात त्यांनी बंधू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला.
महिला आरक्षणाच्या मुद्यावर भाजपकडून एका महिलेने सुरुवात करण्याऐवजी निशिकांत दुबे यांना संधी दिली गेली त्याबद्दल काँग्रेसकडून जेव्हा शेरेबाजी झाली तेव्हा गृहमंत्री अमित शाह म्हणाले, महिलांच्या भल्यासाठी केवळ महिलांनीच बोलावे असे नाही, पुरुषही बोलू शकतातच. आम्ही भाऊ म्हणून बोलू शकतो. या वाक्याचा संदर्भ घेत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना टोला लगावला. ‘प्रत्येक घरात असे भाऊ असतातच असे नाही की जे बहिणीचे कल्याण बघतील. प्रत्येकाचे नशीब एवढे चांगले नसते’, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आज नेमके वेगळे काय झाले?
महिला आरक्षण विधेयकावरील भाषणादरम्यान ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आठवण काढली. त्या म्हणाल्या की, हे विधेयक माझे पती राजीव गांधी यांनी आणले होते. अमित शाह यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना म्हटले, मी येथे राज्यघटनेतील १२८ व्या दुरुस्तीबाबत बोलण्यासाठी उभा आहे. असे सांगताच विरोधकांनी एकच गोंधळ घातला. यावर शाह म्हणाले- घाबरू नका.
राहुल गांधी म्हणाले, आमच्या संस्थांमध्ये ओबीसींचा सहभाग काय आहे यावर मी संशोधन केले आहे. दरम्यान, खासदारांनी गदारोळ सुरू केला. त्यावर राहुल गांधी म्हणाले- घाबरू नका, मी जात जनगणनेबद्दल बोलतोय. कानीमोळी करुणानिधी महिला आरक्षण विधेयकावर बोलण्यासाठी उभ्या राहिल्यावर भाजप खासदारांनी गदारोळ सुरू केला, तेव्हा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांची साथ मिळाली. दोघींनीही मग उभे राहून खासदारांच्या या कृतीचा निषेध केला. वायएसआर काँग्रेस पक्षाच्या आंध्र प्रदेशातील काकीनाडा मतदारसंघातील खासदार गीता विश्वनाथ गंगा यांनी ‘भारत माता की जय’चा नारा देत पारंपरिक पद्धतीने सर्वांना अभिवादन केले.