नवी दिल्ली : ‘इतने बडे देश मे इस तरह का हादसा पहली बार नही हुआ है’, असे म्हणून गोरखपूर येथील बालमृत्यू प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी फेटाळली.गोरखपूरच्या बाबा राधवदास इस्पितळात आॅक्सिजनअभावी गेल्या आठवडाभरात ६३ बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे हे सरकारच्या निष्काळजीपणाचे बळी आहेत, असा आरोप करून काँग्रेसने आदित्यनाथ सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीसंबंधी विचारता अमित शहा पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘काँग्रेसका काम है इस्तिफा मांगना. लेकिन इस्तिफा देने का कोई कारन नही. इतने बडे देश मे बहुत सारे हादसे हुए है. पहली बार ऐसा हादसा नही हुआ है’.
गोरखपूर घटनेवरून उत्तर प्रदेश शोकाकूल असताना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी राज्यात जन्माष्टमी धुमधडाक्यात व पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावरून होत असलेल्या टिकेविषयी विचारता अमित शहा म्हणाले, ‘ जन्माष्टमी अपनी जगह पे है. जैसे देश मे होगी वैसे युपी मे लोगोंके पर्सनल बिलिफ के आधार पर होगी. यह गव्हर्नमेंट का त्योहार नही है!.