दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या दिल्ली मद्य धोरण घोटाळा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार कारागृहात आहेत. ते तुरुंगात आपली प्रकृती खालावत असल्याचा आरोप करत आहेत. यातच, आम आदमी पक्षाने आणखी एक गंभीर आरोप केला आहे. केजरीवाल यांचे इन्सुलिन पातळी सातत्याने वाढत आहे. मात्र त्यांना इन्सुलिनचा डोस दिला जात नाहीये, असा दावा आम आदमी पक्षाचे नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. एवढेच नाही, तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचे कट कारस्थान सुरू आहे, असा आपोरही भारद्वाज यांनी केला आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
सौरभ भारद्वाज म्हणाले, "अरविंद केजरीवाल कारागृहातील डॉक्टरांना वारंवार विनंती करत आहेत की, माझी शुगर पातळी वाढत आहे. मला इन्सुलिन द्या. मात्र, केजरीवाल खोटे बोलत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. डीजी आणि डीआयजींकडेही इन्सुलिनची मागणी केली. मात्र, त्यांनीही इन्सुलिन देण्यास नकार दिला."
मल्टीऑर्गन फेल्यरही होऊ शकते...!यासंदर्भात, दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी एका एक्स पोस्टमध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांची शुगर लेवल रीडिंग शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, "ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची 12 एप्रिल ते 17 एप्रिल पर्यंतची, शुगर लेवलची रीडिंग आहे. जर एवढ्या हाय शुगर लेवलवर इन्सुलिन दिले गेले नाही, तर व्यक्तीला हळू हळू मल्टीऑर्गन फेल्यर होऊ शकते. असे कसे क्रूर सरकार आहे, जे डायबिटीज रुग्णाला इन्सुलिन देण्यास नकार देत आहे?"
केजरीवाल यांना दिलं जात नाहीय इन्सुलिन -आप नेते सौरभ भारद्वाज पत्रकार परिषदेत केजरीवाल यांच्या हवाल्याने म्हणाले, त्यांच्या इन्सुलिनची पातळी 15 दिवसांपासून वाढत आहे. मात्र, त्यांना इन्सुलिन दिले जात नाही. आपल्या डॉक्टरांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मागणीला जेल प्रशासन कथितपणे विरोध करत आहे. यासंदर्भात सौरभ भारद्वाज म्हणाले, जर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली तर ईडी, सीबीआय आणि केंद्र सरकारचे काय बिघडेल.