जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
शिक्षकदिन हा गुरूउत्सव म्हणून साजरा करण्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शिक्षकदिनाच्या नावात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचा खुलासा केला. त्या दिवशी घेण्यात येणा:या निबंध स्पर्धेचे नाव गुरूउत्सव आहे, असे इराणी म्हणाल्या.
देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षकदिनऐवजी गुरूउत्सव म्हणून साजरा करण्याचा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या निर्णयावर काँग्रेस आणि भाजपाचे घटकपक्ष एमडीएमके आणि पीएमकेने सरकारवर टीका केली.
तामिळनाडूतील भाजपाच्या घटक पक्षांनी शिक्षकदिनाचे नामकरण गुरूउत्सव करण्यास विरोध केला आहे. पीएमकेने संस्कृत लादण्याचा छुपा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. याआधी डीएमकेने नाव बदलण्यास विरोध केला होता. त्यानंतर स्मृती इराणी यांनी सोमवारी भाजपा मुख्यालयात अनौपचारिक चर्चेदरम्यान खुलासा केला. 5 सप्टेंबरला पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण आणि संवाद कार्यक्रम ऐच्छिक असल्याचे त्या म्हणाल्या.
याआधी मंत्रलयाने परिपत्रक काढून गुरूउत्सवच्या दिवशी पंतप्रधान नवी दिल्लीतील माणोक शॉ ऑडिटोरियममध्ये सुमारे एक हजार शाळकरी मुलांना संबोधित करतील. टेलिकॉन्फरसिंगच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण देशभरातील 18 लाख सरकारी शाळेत दाखविण्यात येईल. दूरदर्शन आणि शिक्षणसंदर्भातील सर्व वाहिन्यांवर दुपारी 3 ते 4.45 वाजेर्पयत कार्यक्रमाचे प्रक्षेपण होईल, असे म्हटले होते. ज्या शाळांकडे टीव्ही संच नसेल त्यांनी भाडय़ाने संच आणावे, असेही म्हटले होते. मनुष्यबळ विकास मंत्रलयाच्या या परिपत्रकाला देशभरातून विशेषत: बिगर भाजपाशासित राज्यातून विरोध झाला होता.
राज्यांना ज्याप्रकारे सक्ती केली जात आहे ती केंद्र सरकारची हुकूमशाही प्रवृती दर्शविते, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटले होते. अशाचप्रकारचे विरोधी सूर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, तामिळनाडू, हरियाणा, पंजाब, कर्नाटक येथेही उमटताना बघून स्मृती इराणी यांनी हे स्पष्टीकरण दिले.