नवी दिल्ली - दिल्लीत भडकलेल्या जातीय दंगलीबाबत आज लोकसभेत वादळी चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील दंगलीसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच या दंगलीत कुणी हिंदू-मुस्लिम नाही तर भारतीय मारले गेले, अशा शब्दात अमित शाह यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीबाबत आज लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. तसेच या दंगलीमुळे प्रभावित झालेल्यांबाबत माहिती सभागृहासमोर मांडण्याची मागणी विरोधी पक्षातील सदस्यांनी केली. त्यानंतर या चर्चेला उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, ‘’मी दंगलीत झालेल्या नुकसानाची आकडेवारी सादर करू शकतो. पण त्यामध्ये हिंदू किंवा मुस्लिम असा भेदभाव करू शकत नाही. तुम्हीसुद्धा असे काही करू नका. दंगलीत किती मुस्लिमांचे नुकसान झाले, किती हिंदूंचे नुकसान झाले ही काही विचारण्याची पद्धत नाही. या दंगलीत ज्यांचे नुकसान झाले ते सर्व भारतीय आहेत. दिल्लीत झालेल्या या दंगलीत ५२ भारतीयांचा मृत्यू झाला. तर ५२६ भारतीय जखमी झाले. तसेच ३०० अधिक भारतीयांची घरे जाळली गेली.’’
दरम्यान, उत्तर प्रदेशमधून आलेल्या ३०० जणांनी दिल्लीत दंगल माजवली. मात्र दिल्ली पोलिसांनी केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे ३६ तासांत ही दंगट आटोक्यात आली, असेही अमित शाह यांनी यावेळी सांगितले.