नीट यूजी परीक्षा ही भारतामध्ये वैद्यकीयशिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा मानली जाते. तसेच दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी ही परीक्षा देत असतात. वैद्यकीयशिक्षणासाठी चांगल्या गुणवत्तेसोबतच सर्वात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयांची प्रचंड असलेली फी. काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश फी एवढी जास्त आहे की सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ती अवाक्याबाहेर आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला स्वस्तामध्ये वैद्यकीय शिक्षण कुठून घेता येऊ शकतं, याची माहिती देणार आहोत. आम्ही अशा वैद्यकीय महाविद्यालयाबाबत सांगणार आहोत त्याची प्रवेश फी केवळ ६० हजार रुपये एवढीच आहे. याचाच अर्थ येथे केवळ ६० हजार रुपयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेता येऊ शकतं.
१९४८ मध्ये सुरू झालेल्या या वैद्यकीय महाविद्यालयावर देशाच्या सशत्र दलांना अधिकाधिक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. हा पूर्णपणे रेसिडेंशियल कॅम्पस आहे. तो पुणे छावणी परिसरात स्थित आहे. एनआयआरएफ मेडिकल कॉलेजच्या रँकिंग लिस्टमध्ये ३०व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारतात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे.
सरकारी संस्था असल्याने येथील एमबीबीएसची फी खूपच कमी आहे. येथे एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी वार्षिक ६० हजार ते ७० हजार रुपये एवढा खर्च येतो. एमडी, एमएससारख्या पीजी प्रोग्रॅमसाठी मात्र अधिक शुल्क आकारलं जातं. एएफएमसी पुणे येथे सामान्य आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गांसाठी नीट यूजी कट ऑफ रँक ही ७२० आणि १६४ दरम्यान होती. या कॉलेजबाबतची अधिक माहिती तुम्हाला www.afmc.nic.in या संकेतस्थळावरून मिळू शकते.