लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना विरोधकांच्या इंडिया आघाडीचा खरपूस समाचार घेतला. विरोधकांची इंडिया आघाडी नाही, तर घमंडिया आघाडी आहे. आघाडीच्या वरातीतील प्रत्येकाला नवरदेव व्हावेसे वाटते आहे. प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे, असे म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
‘घमंडिया’ आघाडी घराणेशाहीचे सर्वांत मोठे प्रतीक आहे. महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, डॉ. राजेंद्रप्रसाद, मौलाना आझाद, लोकनायक जयप्रकाश, डॉ. लोहिया यांनी घराणेशाहीवर उघड टीका केली. घराणेशाहीमुळे सामान्य नागरिक त्यांच्या अधिकारांपासून वंचित राहिले. काँग्रेसला घराणेशाही आवडते, अशी टीका पंतप्रधानांनी केली.
त्यांना ‘एनडीए‘चाच आधारमोदी म्हणाले की, स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी त्यांना ‘एनडीए‘चाच आधार घ्यावा लागला आहे. पण त्यात घमेंडीचे दोन ‘आय’ घुसवले. पहिला ‘आय’ २६ पक्षांची घमेंड आणि दुसरा ‘आय’ एका कुटुंबाची घमेंड. त्यासाठी इंडियाचेही तुकडे केले. लोकांमध्ये काँग्रेसविषयी अविश्वासाचा भाव अतिशय गहरा आहे.
काँग्रेस अहंकारात चूरकाँग्रेस अहंकारात इतकी चूर आहे की त्यांना जमीन दिसत नाही. तमिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, त्रिपुरा, ओडिशा, नागालँड, दिल्ली, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये १९६२ पासून आजवर लोकांनी काँग्रेसवर अविश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या सामर्थ्यावर काँग्रेस आणि मित्रपक्षांचा कधीच विश्वास राहिला नाही. लाल किल्यावरून देशाला संबोधताना शौचालय, जनधन खाते, योग, आयुर्वेद, स्टार्टअप इंडिया, डिजीटल इंडिया, मेक इन इंडिया अशा सर्व गोष्टींची त्यांनी खिल्ली उडविली. त्यांचा भारताच्या सैन्यापेक्षा शत्रूंच्या दाव्यांवर, पाकिस्तान, हुरियत, पाकिस्तानचा झेंडा घेणाऱ्यांवर आणि फुटिरवाद्यांवर विश्वास होता.२०२८ मध्ये पुन्हा या सातत्याच्या जोरावर आम्ही तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू. देशाचा विश्वास २०२८ साली जेव्हा तुम्ही अविश्वास प्रस्ताव मांडाल तेव्हा हा देश पहिल्या तीनमध्ये असेल, असा टोला मोदींनी लगावला.
देशाच्या सामर्थ्यावर विश्वास नाहीमोदी म्हणाले की, विरोधकांना देशाच्या सामर्थ्यावर, परिश्रम आणि पराक्रमावर विश्वास नाही. आमच्या सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे आपण म्हटले होते.
या कालखंडाचा प्रभाव हजार वर्षांपर्यंत राहणार मोदी म्हणाले की, कोणत्याही देशाच्या इतिहासात एक वेळ असा येतो जेव्हा जुन्या बंधनांना तोडून नवी ऊर्जा, संकल्पासह पुढे जाण्याचा संकल्प करतो. एकविसाव्या शतकातील हा कालखंड भारतासाठी प्रत्येक स्वप्न सिद्ध करण्याची संधी आमच्या पायाशी येणार आहे, हे आपण अतिशय गंभीरपणे आणि दीर्घ अनुभवांती नमूद करतो आहे. हा कालखंड घडेल त्याचा प्रभाव या देशावर येणाऱ्या एक हजार वर्षांपर्यंत राहणार आहे. भारताच्या युवकांना घोटाळेरहित सरकार, खुल्या आकाशात उडण्याचे प्रोत्साहन आणि संधी दिली आहे.
विरोधकांना लाभलेले गुप्त वरदानn विरोधक ज्याचे वाईट चिंततात त्याचे कसे भले होते, अशी तीन उदाहरणे देऊन मोदींनी सांगितले. मोदी तेरी कब्र खुदेगी ही त्यांच्यासाठी सर्वात प्रिय घोषणा आहे. त्यांच्या शिव्या, अपशब्द, त्यांच्या भाषेचेही मी टॉनिक बनवले आहे. n ज्याचे वाईट चिंततात त्याचे भलेच होते, असा विरोधकांना एक गुप्त वरदान लाभले आहे, यावर माझा पक्का विश्वास बसला आहे. एक उदाहरण तर इथे माझ्या रूपाने उपस्थितच आहे. n वीस वर्षे झाली. काय नाही केले त्यांनी. पण भलेच होत गेले. बँकिंग क्षेत्र बुडेल, देश उद्ध्वस्त होईल, अशी अफवा पसरविण्याचे काम त्यांनी केले होते. पण झाले उलटेच. सार्वजनिक बँकांचा नफा दुप्पट झाला.