- संजय शर्मानवी दिल्ली : देशाचे नाव आता ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ करण्यासाठी केंद्रीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-२० देशांच्या राष्ट्राध्यक्षांसाठी आयोजित स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर मुर्मू यांचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा करण्यात आला आहे. त्यावरून जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात देशाचे नाव ‘भारत’ करण्यासाठी केंद्र सरकार विधेयक पारित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
किती देशांनी बदलले नाव? आतापर्यंत सिलोनचे श्रीलंका, बेचुयानालँडचे बोत्सवाना, एबिसिनियाचे इथिओपिया, ट्राजार्डेनचे जॉर्डन, बर्माचे म्यानमार, तुर्कीएचे तुर्की, हॉलंडचे नेदरलँड, फारसचे इराण व सियामचे थायलँड असे नामांतर झाले.
आरोप-प्रत्यारोप ‘भारत’ नावावर राजकीय वादही सुरू झाला आहे. विरोधी पक्ष काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप व राजदने यावर टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ‘इंडिया’ आघाडीला घाबरूनच देशाच्या नावातून ‘इंडिया’ हटवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. ‘इंडिया’ हे नाव विरोधकांच्या आघाडीला जोडले गेल्यामुळे नेत्यांवर किंवा आघाडीवर थेट हल्लाबोल करता येत नाही, ही बाब भाजप नेत्यांनीही स्वीकारली आहे. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आघाडीला आपल्या भाषेत ‘घमंडिया आघाडी’ हे नाव दिले आहे.
मोहन भागवत यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला जोर
संसदेचे विशेष अधिवेशन अचानक का बोलावले, याचा अजेंडा आता स्पष्ट होत आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर चर्चा रंगली असतानाच आता देशाचे नाव बदलण्याची तयारी केली जात आहे. त्याचा प्रत्यय जी-२० च्या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी देशातील लोकांनी जगात कुठेही गेले, तरी स्वत:ला ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ देशाचा नागरिक म्हणण्यास सुरुवात करावी, असे म्हटले होते. त्याच अनुषंगाने विशेष अधिवेशनात प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली जात आहे.
देशाच्या सन्मान आणि गौरवाशी निगडित प्रत्येक विषयावर काँग्रेस दरवेळी का आक्षेप घेते? भारत जोडो नावाने यात्रा करणाऱ्यांना ‘भारतमाता की जय’ उद्घोष करणाऱ्यांविरोधात इतका द्वेष का? - जगत प्रकाश नड्डा, अध्यक्ष, भाजपइंडिया म्हणजेच भारत, हे संघराज्य आहे. एक देश, एक निवडणूक हा संघराज्य प्रणाली व त्याच्या सर्व राज्यांवर हल्ला आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते.‘इंडिया’ हा भारत आहे, त्यामुळे अचानक असे काय झाले की, देशाने फक्त भारतच म्हणायला हवे. आपण देशाला भारत म्हणतो, इंग्रजीत ‘इंडिया’. त्यात नवीन काही नाही. देशात इतिहासाचे पुनर्लेखन केले जात आहे. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल सध्या जनतेत ‘इंडिया’ला ज्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे नाव काढण्याचा प्रयत्न केला जात असेल. मात्र, इंडिया हे नाव हटविण्याचा कोणालाही अधिकार नाही. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस