देवेगौडांचे पुत्र म्हणतात, कर्नाटकमध्ये किंगमेकर नव्हे, किंग बनणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 06:46 PM2018-04-29T18:46:17+5:302018-04-29T18:46:42+5:30
मतदानपूर्व कलचाचण्यांमधून कर्नाटक विधानसभेचा निकाल त्रिशंकू लागून, देवेगौडांचा जनता दल सेक्युलर पक्ष किंगमेकर बनेल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र देवेगौडांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांनी आगामी निवडणुकीत
बंगळुरू - अवघ्या पंधरवड्यावर आलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस, भाजपा आणि जनता दल (सेक्युलर) हे पक्ष कंबर कसून तयार झाले आहेत. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तशी चुरसही वाढत चालली आहे. मतदानपूर्व कलचाचण्यांमधून कर्नाटक विधानसभेचा निकाल त्रिशंकू लागून, देवेगौडांचा जनता दल सेक्युलर पक्ष किंगमेकर बनेल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र देवेगौडांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांनी आगामी निवडणुकीत त्यांचा पक्ष किंगमेकर नाही तर किंग बनेल, असा दावा केला आहे.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना कुमारस्वामी म्हणाले, "कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर पक्ष पूर्ण बहुमतासह विजयी होईल असा मला संपूर्ण विश्वास आहे. आमच्या पक्षाला बहुमत मिळेल याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंका नाही.
काँग्रेस, भाजपा आणि जनता दल धर्मनिरपेक्ष या तीन प्रमुख पक्षांमध्ये कर्नाटक विधानसभेची खरी लढत आहे. ओपिनियन पोलने दाखवलेल्या अंदाजामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यापैकी कोणालाही पूर्ण बहुमत मिळेल असा थेट कौल मिळालेला नाही. तर येणारी विधानसभा त्रिशंकू असेल असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र सर्व ओपिनियन पोलमधून माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाला किंगमेकर होण्याची संधी चालून येत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र देवेगौडांचे पुत्र असलेल्या कुमारस्वामींना ओपिनियन पोलमधील आकडे मान्य नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार " बहुमतासाठीच्या 113 जागा जिंकणे हे आमचे प्रमुख लक्ष्य आहे. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. अखेरीस आम्ही आम चे लक्ष गाठू याचा मला विश्वास आहे. माझ्या सध्याच्या अंदाजानुसार आमचा पक्ष 97 ते 105 जागांवर सहजपणे विजयी होईल. त्यामुळे उर्वरित जागा जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."
कर्नाटक विधानसभेची यंदाची निवडणूक जनता दल सेक्युलर पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असल्याचे ते मान्य करतात. ''गेल्या दहा वर्षांपासून आम्ही सत्तेतून बाहेर आहोत, त्यामुळे आमच्यासाठी ही नक्कीच अस्तित्वाची लढाई आहे. पण आम्हाला स्वार्थासाठी सत्ता नको. गेल्या दहा वर्षांत भाजपा आणि काँग्रेसने इथे अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे."असे कुमारस्वामी म्हणाले.