शीलेश शर्मा, ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २४ - उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षात सुरु असलेल्या 'यादवी'मागे मुलायमसिंह यादव यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता असल्याचे बोलले जात आहे. साधना गुप्ताला तिचा मुलगा प्रतीकला मुलायमसिंह यांचे उत्तराधिकारी बनवायचे आहे. साधना गुप्ताच्या या महत्वकांक्षेला शिवपाल आणि अखिलेश विरोधी गटाचे समर्थन आहे.
प्रतीक मुलायम यांचाच मुलगा असल्याचा साधना यांचा दावा असला तरी, सीबीआयच्या २ (ए)२००७/एसीयू-४/ अहवालानुसार प्रतीकचे खरे पिता चंद्र प्रकाश गुप्ता आहेत. १९९० साली साधना गुप्ता आणि चंद्रप्रकाश यांचा घटस्फोट झाला.
अखिलेशला जो दर्जा मिळतो तोच प्रतीकला मिळाला पाहिजे अशी साधना यांची मागणी आहे. मुलायमसिंह आपल्या आईकडे दुर्लक्ष करुन साधना सिंहला प्राधान्य देतात त्याचा राग अखिलेश यांना आहे. १९९४ साली प्रतीक गुप्ताचे नाव बदलून प्रतीक यादव झाले. साधनामुळे मुलायम यांनी अखिलेशची आई मालतीदेवी यांच्याकडे दुर्लक्ष केले. २००३ साली अखिलेशच्या आईचे निधन झाले आणि साधना गुप्ताचा मुलायम सिंह यादव यांच्यावरील प्रभाव जास्तच वाढला.
मुलायम सिंह साधना गुप्ताचा सल्ला घेऊ लागले आणि प्रतीकचाही निर्णयातील हस्तक्षेप वाढला. अखिलेश यांना हे अजिबात पसंत पडले नाही. परिणामी पिता-पुत्रामधील मतभेदांची दरी वाढू लागली. अॅडवोकेट विश्वनाथ चर्तेुवेदी यांच्या तक्रारीवरुन न्यायालयाच्या आदेशाने उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी चौकशी सुरु झाली तेव्हा हा खुलासा झाला. प्रतीक मुलायमसिंह यादव यांचा मुलगा असल्याचे साधना गुप्ता सांगत होती पण प्रत्यक्षात प्रतीकचे वडील चंद्र प्रकाश गुप्ता आहेत.