महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जात असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा पराभव केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र केवळ महाराष्ट्रात नाही तर आज देशातील इतर काही राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांच्या मतमोजणीतही काँग्रेसने बाजी मारली आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये झालेल्या प्रत्येकी एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
पश्चिम बंगालमधील सागरदिघी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने ममता बॅनर्जी यांना जोरदार धक्का दिला आहे. येथे झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बायरन बिस्वास यांनी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार देबाशिष बंडोपाध्याय यांना २२ हजार ९८० मतांनी पराभूत केले आहे. तर या मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार दिलीप साहा हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेसचे उमेदवार बायरन बिस्वास यांना ८७ हजार ६११ मते मिळाली. तर तृणमूल काँग्रेसच्या देबाशिष बंडोपाध्याय यांना ६४ हजार ६३१ मते मिळाली. भाजपाच्या दिलीप साहा यांना २५ हजार ७९३ मतांवर समाधान मानावे लागले. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या पंचायतीच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
तामिळनाडूमधील इरोड पूर्व मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार ई. व्ही. ईलनगोवन हे आघाडीवर आहेत. त्यांनी एआयएडीएमकेचे उमेदवार के. के. थेन्नारासू यांच्यावर तब्बल ३३ हजारांहून अधिकची आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसचे उमेदवार ई. व्ही. ईलनगोवन यांना ५३ हजार ४४१ मते मिळाली आहेत. तर प्रसिस्पर्धी थेन्नारासू यांना केवळ २० हजार ६६ मते मिळाली आहेत.