चौकीदार भागीदारच नव्हे, तर गुन्हेगारही; मल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 11:32 PM2018-09-14T23:32:27+5:302018-09-14T23:33:10+5:30
राफेल सौदा आणि विजय मल्ल्याप्रकरणावरुन काँग्रेसची भाजपावर सडकून टीका
नवी दिल्ली : राफेल सौदा आणि विजय मल्ल्याप्रकरणीकाँग्रेसने शुक्रवारीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. मल्ल्याला विदेशात पसार करण्यात वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या कथित भूमिकेवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टष्ट्वीट करून सवाल उपस्थित केला आहे. मल्ल्याला विदेशात जाण्यापासून रोखण्यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या लूकआऊट नोटीसचे रूपांतर सीबीआयने गुपचूपपणे सूचनावजा नोटिसीत केले. सीबीआय थेट पंतप्रधानांच्या नियंत्रणात येते. तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या संमतीशिवाय सीबीआयने नोटिसीत परस्पर बदल केला, यावर विश्वासच बसत नाही.
प्रश्नांची सरबत्ती करून काँग्रेसने मोदींवर थेट निशाणा साधला. चौकीदार, भागीदारच नव्हेतर गुन्हेगारही आहे, असा थेट आरोपही काँग्रेसने केला. राहुल गांधी यांनी दुसऱ्या टिष्ट्वटमध्ये वित्तमंत्री अरुण जेटली यांनाही घेरले आहे. अडीच वर्षांपूर्वी मल्ल्याशी झालेल्या भेटीबाबत एकाही तपास संस्थेला त्यांनी थांगपत्ता लागू दिला नाही. मल्ल्याने आपण लंडनला जात असल्याचे सांगितले होते, असे त्यांना अचानक आठवले. यातून जेटली यांची भूमिका काय होती, असे स्पष्ट होते.
राहुल यांच्या टिष्ट्वटनंतर काँग्रेसने चौफेर आरोपांच्या फैरी झाडल्या. भाजपमध्येही जेटली कोंडीत सापडले आहेत. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी आणि कीर्ती आझाद यांनी गंभीर आरोप करून लूक आऊट नोटीसला सीबीआयकडून कोणी बदलून घेतले याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. काँग्रेसने विचारले आहे की, चौकशीविना विजय मल्ल्या ५६ सुटकेसेस घेऊन लंडनला पळून जाण्यात कसा यशस्वी झाला? मार्च २०१६ मध्ये राज्यसभेत मल्ल्यावर झालेल्या चर्चेत जेटली यांनी या भेटीचा खुलासा का केला
नाही?
सर्वोच्च न्यायालयातील वकील दुष्यंत देव यांच्याकडे २८ फेब्रुवारी २०१६ रोजी स्टेट बँकेचे अधिकारी मल्ल्या प्रकरणात सल्ला मागायला गेले होते. दवे यांनी सल्ला दिला की, २९ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल करून मल्ल्या याचा पासपोर्ट रद्द करावा, नाही तर तो देश सोडून पळून जाईल; परंतु एसबीआयने पासपोर्ट रद्द करण्यासाठी अर्ज केला नाही व परत दवे यांच्याकडे ते अधिकारी आलेही नाहीत.
काँग्रेसने विचारले की, मल्ल्या याला संरक्षण देण्यासाठी स्टेट बँकेला लगाम घालणारा कोण होता? असाच प्रश्न जेटली यांचे मित्र व माजी अटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनीही विचारला आहे. ते म्हणाले की, देश सोडून जा, असा सल्ला मल्ल्या याला कोणी दिला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोदी यांना आरोपीच्या पिंजºयात उभे करून म्हटले आहे की, चौकीदार भागीदारच नाही तर गुन्हेगारदेखील आहे.
कोणाच्या इशाºयावरून मोकळीक?
कोणाच्या इशाºयावरून सीबीआय, ईडी, एसएफआयओने विजय मल्ल्याला पळून जाण्याची मोकळीक देऊन त्यांचा बचाव केला? हे पंतप्रधानांनी स्पष्ट करावे. पी. एल. पुनिया यांच्या आरोपावर जेटली गप्प का? हिंमत असेल तर त्यांनी पुनिया खोटे बोलत असल्याचे सांगावे, असे रणदीप सुरजेवाला म्हणाले.
लंडनला जाण्याच्या एक दिवस आधी मल्ल्या आणि जेटली यांना संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आपसात चर्चा करताना पाहिले, असा पुनिया यांचा दावा आहे. त्यावेळी मीसुद्धा मध्यवर्ती सभागृहात होतो, असे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी स्पष्ट करून पुनिया यांच्या दाव्याला पुष्टी दिली आहे.