ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारतावर मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव फक्त काश्मीरमध्येच साजरा करण्यात आला नसून, देशाच्या अन्य काही भागातही असे प्रकार घडले आहेत. राजस्थानमध्ये पाकिस्तानचा विजय साजरा करणा-या पाच जणांवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. तीन राज्यांमध्ये पाकिस्तान जिंकल्याचा आनंद साजरा करण्यात आल्याच्या घटना घडल्या असून, तीन अल्पवयीन मुलांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मध्यप्रदेशात पाकिस्तान जिंकल्याच्या आनंदात फटाके फोडून घोषणाबाजी करणा-या 15 जणांना अटक केली आहे. देशद्रोहाच्या आरोपाचा गुन्हा सिद्ध झाला तर, दोषीला आयुष्यभरासाठी तुरुंगवास होऊ शकतो. राजस्थान बिकानेरमधून अटक केलेल्या पाच जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी फायनलमध्ये पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर सुभाषपूरा येथील मुस्लीम युवक ड्रम वाजवून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत होते. स्थानिक रहिवाशांनी याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
या पाचही जणांना न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली आहे. हिंदू जागरण मंच आणि अन्य संघटनांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पत्र दिले असून त्यांनी कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे. भारतीय संघाच्या पराभवाने काश्मीरमधील फुटिरतावाद्यांना आपल्या भारतद्वेशाला मोकळी वाट करून देण्याची संधी मिळाली. चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा विजय झाल्यावर फुटिरतावाद्यांनी फटाके फोडून जल्लोश केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत., त्यांनी भारतविरोधी घोषणाही दिल्या.
श्रीनगरमध्ये तरुणांनी फटाके फोडून पाकिस्तानचे झेंडे फडकवून आनंद साजरा केला. भारतविरोधी घोषणाबाजीही केली. श्रीनगरमधील फतेहकदाल, साकीदफर आणि अनंतनाग येथे पोलिस आणि लष्कराच्या तळांवर फटाके फेकणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्रालमध्ये सुद्धा पाकिस्तानच्या विजयानंतर महिला आणि पुरुषांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोश साजरा केला.
दरम्यान केंद्रातल्या मोदी सरकारवर देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप झाला आहे. एखाद्या मुद्यावर मतभेद असले तर ते समजून न घेता केंद्रातील भाजपा सरकार देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर करते असा आरोप विरोधकांनी केला होता.