जिल्हे, योजना, ठिकाणं अन् संग्रहालय...; मोदी सरकारमध्ये कशा-कशाची नावं बदलली?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 04:40 PM2023-06-16T16:40:28+5:302023-06-16T16:41:42+5:30
Nehru Memorial Museum: मात्र मोदी सरकारच्या काळात असे पहिल्यांदाच झाले, असे नाही. यापूर्वीही जिल्हे, योजना आणि संग्रहालयांची नावे बदलण्यात आली आहेत.
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या कार्यकाळात आणखी एका ठिकाणाचे नाव बदलण्यात आले आहे. दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्यूझियमचे नाव आता पीएम म्यूझियम करण्यात आले आहे. यामुळे काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारचा विरोध केला आहे. संकुचित विचार आणि प्रतिशोधाचे दुसरे नाव मोदी आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
मात्र मोदी सरकारच्या काळात असे पहिल्यांदाच झाले, असे नाही. यापूर्वीही जिल्हे, योजना आणि संग्रहालयांची नावे बदलण्यात आली आहेत.
9 वर्षांत कशा कशाची नावं बदलली? -
योजना आयोगाचे झाले नीती आयोग -
देशासाठी पंचवार्षिक योजना तयार करण्याचे काम योजना आयोग करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच योजना आयोगाचे नाव बदलण्याची गोषणा केली. 2014 मध्ये योजना आयोगाचे नाव बदलून नीती आयोग करण्यात आले.
रेस कोर्स झाले लोक कल्याण मार्ग -
पंतप्रधान ज्या निवासस्थानात राहतात, त्याला पूर्वी सेवन रेस कोर्स (7 आरसीआर) म्हटले जाते. मोदी सरकारने 2016 मध्ये याचे नाव बदलून लोक कल्याण मार्ग केले.
औरंगजेब रोडचे नाव बदलले -
एवढेच नाही, तर नरेंद्र मोदी सरकारने दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलून माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने ठेवले आहे.
राजपथ नाही, करतव्य पथ -
राष्ट्रपती भवनापासून ते इंडिया गेटपर्यंत जो रस्ता जातो, त्याला राजपथ म्हटले जात होते. एनडीएमसी एक प्रस्ताव घेऊन आले. यानंतर याचे नाव बदलून कर्तव्य पथ कण्यात आले. राजपथपूर्वी हा मार्ग, किंग्सवे नावाने ओळखला जायचा.
गुडगावचे गुरुग्राम आणि आलाहाबादचे प्रयागराज -
गेल्या 2018 मध्ये यूपीतील योगी सरकारने मुगलसराय जंक्शनचे नाव बदलून दीन दयाल उपाध्याय जंक्शन केले. यानंतर, आलाहाबाद जिल्याचे नाव बदलून प्रयागराज आणि फैजाबाद ऐवजी अयोध्या जिल्हा. याच पद्धतीने, हरियाणातील खट्टर सरकारने गुडगावचे ननाव बदलून गुरुग्राम केले आहे.
मुगल गार्डन आता अमृत उद्यान -
याच वर्षी जानेवारी महिन्यात राष्ट्रपती भवनातील मुगल गार्डनचे नाव बलदलून अमृत उद्यान करण्यात आले आहे. मुगल गार्डनचे नाव बदलल्यानंतर, विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती.