चीन : चीन आणि भारत यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आपली काय जबाबदारी आहे? जेव्हा सीमेवर तणाव निर्माण होतो तेव्हा सामान्य नागरिक हा विचार करून झोपी जातो की, सैनिक याला प्रत्युत्तर देतील; पण आज मी लोकांना सांगू इच्छितो की, यावेळी केवळ सैनिकांचे उत्तर नव्हे, तर नागरिकांचेही प्रत्युत्तर यायला हवे, अशा शब्दांत शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रयोगकर्ते सोनम वांग्चुक यांनी आपले विचार व्यक्त केले.
वांग्चुक म्हणाले की, दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि देशांच्या दुसऱ्या शहरांतील लोक काय करू शकतात? यासाठी आम्हाला अगोदर चीनच्या कुरापती आणि ते असे का करीत आहेत, ते समजून घ्यावे लागेल. हे केवळ भारतासोबत होत नाहीय. चीन गत काही आठवड्यांपासून दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनाम, र्तैवान आणि आता हाँगकाँगसोबत कुरापती काढत आहे. मला असे वाटते की, एखाद्या देशाशी दुश्मनीपेक्षा ते आपल्या अंतर्गत समस्या सोडविण्यासाठी असे करीत आहे. आज चीनला सर्वाधिक भीती आतून आहे. कारण, १४० कोटी लोक वेठबिगारांप्रमाणे काम करीत आहेत. ते नाराज होतील तेव्हा क्रांती होऊ शकते. त्याला चीन घाबरतो. कोरोनानंतर तेथे बेरोजगारी वाढली आहे. लोक नाराज आहेत. क्रांती होऊ शकते. सत्तापालट होऊ शकतो. त्यामुळे शेजाऱ्यांशी दुश्मनी करत जनतेला आपल्यासोबत घेण्याचा चीनचा प्रयत्न आहे. चार वर्षे दुष्काळ आणि भूकमारी झाल्याने १९६२ मध्ये भारतासोबत चीनने लढाई केली होती.
जरा विचार करा आम्ही भारतीय उद्योजकांना मारून चीनच्या कपड्यापासून ते अन्य वस्तूंच्या माध्यमातून दरवर्षी पाच लाख कोटींच्या वस्तू खरेदी करतो. हा पैसा पुढे जाऊन आमच्या सीमेवर शस्त्र आणि बंदूक होऊन आमच्या सैनिकांच्या मृत्यूला कारणीभूत होऊ शकतो. यासाठी आमच्या देशातील १४० कोटी लोकांंनी आणि तीन कोटी लोक जे विदेशात राहतात त्यांनी एकत्र येऊन जर भारतात आणि जगात एक बायकॉट मूव्हमेंट चायना (बहिष्कार चळवळ) सुरू केली तर? त्यांची अर्थव्यवस्था डळमळीत होईल. जनतेत रोष निर्माण होईल. त्यानंतर विरोध आणि सत्तांतर. आपल्या लोकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा. मी नेहमीच सांगतो की, २१ व्या शतकात देशासाठी जीव देण्याची नव्हे, तर नवं आयुष्य देण्याची गरज आहे. आपणही आपली भूमिका पार पाडा. जय हिंद.‘मेड इन चायना आयुष्यातून काढणार’एकीकडे आमचे तरुण चिनी गेम्स, अॅप, टिकटॉक यात व्यस्त आहेत. कोट्यवधी रुपये चीनला पाठवीत आहेत. त्यासाठी एक नागरिक म्हणून आम्ही उत्तर द्यायला हवे. बहिष्काराची मोहीम भारतासाठी वरदान सिद्ध होईल. आमच्या पंतप्रधानांनी एक व्हिजन आम्हाला दिले आहे. स्वावलंबनाचे. यातून देशातील कामगारांना रोजगार मिळेल.आमच्या तरुणांनी एका आठवड्यात चिनी सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करावे. त्यांचे हार्डवेअर वापरणे कमी करीत जावे. मी नेमके काय करणार आहे? माझ्या फोनवर जे काही चिनी अॅप आहेत ते एका आठवड्यात हटविणार आहे. तसेच, हा जो फोन चीनमध्ये बनला आहे तोही एका आठवड्यात वेगळा करणार आहे.ज्या वस्तूंवर मेड इन चायना लिहिले आहे त्यांना आयुष्यातून काढणार आहे. मला चीन अथवा चिनी लोकांपासून काही समस्या नाही. चीन सरकार आणि त्यांच्या भूमिकेची समस्या आहे. जोपर्यंत चीनमध्ये परिवर्तन होत नाही आम्हाला असे करावे लागेल.