अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आता केवळ काही दिवसांचा अवधी उरला आहे. मात्र या सोहळ्याची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतसे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत वादही निर्माण होत आहेत. त्यातच मंदिराचं बांधकाम अपूर्ण असताना राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना होत आहे, असा आरोप करून या मंदिराला विरोध केला जात आहे. काही शंकराचार्यांनी अपूर्ण मंदिरात होणारी प्राण प्रतिष्ठापना ही विधिविधानाच्या विरोधात असल्याचा आरोप करत या प्राणप्रतिष्ठापनेला विरोध केला आहे. मात्र देशात याआधीही अनेक मंदिरांचं बांधकाम पूर्ण होण्याआधी त्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना झाली होती, अशी माहिती समोर येत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात प्राचीन सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी झाली होती. त्यावेळी ११ मे १९५१ रोजी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. मात्र त्यावेळी या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं नव्हतं.
जे.डी. परमार यांनी लिहिलेल्या प्रभास तीर्थ दर्शन: सोमनाथ नावाच्या पुस्तकामध्ये याबाबतचा उल्लेख आढळतो. मे १९५१ मध्ये झालेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर अनेक वर्षांपर्यंत सोमनाथ मंदिरामध्ये बांधकाम सुरू होते. या पुस्तकातील १८ व्या पानावरून हे समजते की, तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ११ मे १९५१ रोजी सोमनाथ मंदिरातील शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना झाली होती. पुस्तकातील याच पानावर असाही उल्लेख आहे की, प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानंतरही श्री सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष महाराजा जामसाहेब दिग्विजय सिंह हे मंदिराच्या निर्मितीमध्ये मार्गदर्शन करत होते. मंदिरातील सभामंडप आणि शिखराचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महारुद्रयाग केला आणि १३ मे १९६५ रोजी दुपारी १२.३० वाजता कलश प्रतिष्ठापना करून तिथे मौल्यवान असा कौशेय ध्वज फडकवला होता.
सोमनाथ मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरही या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती मिळत आहे. संकेतस्थळानुसार नवं सोमनाथ मंदिर अनेक टप्प्यांमध्ये बनवण्यात आलं आहे. नव्या मंदिरामध्ये तीन भाग होते. पहिला शिखर, दुसरा सभामंडप आणि तिसरा नृत्यमंडप. यामधील पहिल्या दोन भागांचं बांधकाम ७ मे १९६५ रोजी पूर्ण झालं. तर पूर्णत: पूनर्निर्मित मंदिराचं १ डिसेंबर १९९५ रोजी तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्याहस्ते उदघाटन झालं होतं.
सोमनाथ मंदिरां हिंदू धर्म आणि संस्कृतीमध्ये खास महत्त्व आहे. हे ज्योतिर्लिंग १२ ज्योतिर्लिंगामधील पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं. हे मंदिर अनेक आक्रमणांची शिकार झालं होतं. मात्र प्रत्येकवेळी त्याचं पुनर्निर्माण झालं. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारानं या मंदिराचं पुनर्निर्माण झालं होतं.