नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरातील बँक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला होता. जवळपास 86 टक्के चलन एकाचवेळेस रद्द करण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात पैशांची कमतरता निर्माण झाली होती. यादरम्यान, बँक कर्मचा-यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. या कालावधीत कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त वेळ केलेल्या कामाचा मोबदला मात्र अद्याप केंद्र सरकारकडून त्यांना मिळालेला नाही, असे बँक कर्मचा-यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर थकीत देणी त्वरित देण्यात यावीत, अन्यथा संपावर जाण्याचा इशारा केंद्र सरकारला देण्यात आला आहे.
8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर दुस-या दिवसापासून चलनातून रद्द करण्यात आलेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं बँकांच्या दैनंदिन कामकाजावर ताण येऊ लागला. नोटाबंदीदरम्यान सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये तसंच यामुळे गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी बँक कर्मचा-यांनी 14-14 तास काम केलं. यादरम्यान त्यांच्या सुट्ट्यादेखील रद्द करण्यात आल्या होत्या. पण अतिरिक्त केलेल्या या कामाचा मोबदला अद्याप केंद्र सरकारकडून त्यांना मिळालेला नाही. म्हणून आता बँक कर्मचा-यांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. थकीत देणी तातडीनं देण्यात यावी, अन्यथा आम्ही संपावर जाऊ, असा इशारा बँक कर्मचा-यांनी दिला आहे.
याबाबत 'ऑल इंडिया बँक्स एम्प्लॉइज असोसिएशन'चे (एआयबीईए) सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी सांगितले की,'बँक कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी यापूर्वी केंद्राकडे अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याची विनंती केली आहे. मात्र, सरकारने आमच्या विनंतीकडे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला कायदेशीर नोटीस किंवा संपाचे हत्यार उगारावे लागणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे एकाही बँकेच्या कर्मचाऱ्याला अद्याप मोबदला मिळालेला नाही'
दरम्यान, नोटाबंदी निर्णयाला आता पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. एक वर्ष उलटूनही बँक कर्मचा-यांना अतिरिक्त कामाचा मोबदला मिळालेला नाही. नोटाबंदीच्या 50 दिवसांच्या काळात सर्व बँकांचे मिळून एकूण 4 लाख कर्मचा-यांनी अतिरिक्त काम केले, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणारा मोबदला त्याच्या वेतनानुसार भिन्न असला तरी, सरासरी सर्व कर्मचाऱ्यांना ताशी 100 ते 300 रुपये असा मोबदला मिळणे अपेक्षित आहे.