पाकिस्तानशी न खेळणं म्हणजे त्यांच्यापुढे शरणागती पत्करण्याहून वाईट; शशी थरुरांचे तर्कट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 01:05 PM2019-02-22T13:05:57+5:302019-02-22T13:15:44+5:30
काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानविरूद्धचा सामना खेळायला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.
नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कप स्पर्धेचा सामना होणार की नाही, याबाबत अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहेत. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळू नये, अशी मागणी जोर धरत आहे. काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानविरूद्धचा सामना खेळायला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. पाकिस्तानशी न खेळणं म्हणजे त्यांच्यापुढे शरणागती पत्करण्याहून वाईट असं थरूर यांनी म्हटलं आहे.
शशी थरूर यांनी '1999 मध्ये कारगिल युद्धं झालं त्या वर्षीही भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कप पाकिस्तानशी खेळला आणि जिंकलासुद्धा. त्यामुळे यंदाच्या वर्षीही वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानशी खेळावं. असं न केल्यास ते शरणागती पत्करण्याहून वाईट होईल' असे म्हटले आहे. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
#WATCH Shashi Tharoor says, "In '1999 Kargil War, India played Pakistan in the cricket World Cup, & won. To forfeit the match this year would not just cost two points: it would be worse than a surrender, since it would be defeat without a fight." pic.twitter.com/yRIExUVJ4c
— ANI (@ANI) February 22, 2019
'वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारत-पाक सामना होणारच'
वर्ल्ड कपपासून पाकिस्तानला बीसीसीआय रोखू शकत नाही. बीसीसीआय व प्रशासकांच्या समितीने (सीओए) अशा मागणीचा कुठलाही अर्ज तयार केलेला नाही. असे पाऊल उचलले तरीही आयसीसीद्वारे हा अर्ज फेटाळला जाईल, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. आयसीसीची मॅरेथॉन बैठक 27 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान दुबईत होईल. दरम्यान, ‘पाकिस्तानला वर्ल्ड कपपासून बीसीसीआय रोखू शकत नाही’, असे आयसीसीने म्हटले आहे.
आयसीसी संविधानानुसार, सदस्य देशाने पात्रता गाठल्यास आयसीसी स्पर्धेत सहभागी होण्याचा त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे पाकला स्पर्धेपासून रोखता येणार नाही, असे हा अधिकारी म्हणाला. दरम्यान सीओए प्रमुख विनोद राय व डायना एडुल्जी यांच्या उपस्थितीत सीओएची शुक्रवारी होणाºया बैठकीत या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता कमीच आहे. पाकला बाहेर काढणारा अर्ज तयार केला, तरी अन्य देशांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता नसून बीसीसीआयकडे बहुमत नाही. यावर मतदान झाले तरी बीसीसीआयचा पराभव निश्चित असेल.
वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तानशी खेळला नाही तर... सांगत आहेत सुनील गावस्कर
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानशी खेळावे की खेळू नये, ही चर्चा सुरू आहे. पण भारतीय संघाने जर पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्ये सामना खेळला नाही, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे.
गावस्कर म्हणाले की, " पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये खेळू देऊ नये, त्यांच्यावर बंदी आणावी, असे काही जण म्हणत आहेत. पण ही गोष्ट तेवढी सोपी नाही. कारण भारत एकटा ही गोष्ट करू शकत नाही. जर भारताला पाकिस्तानवर बंदी आणायची असेल तर त्यांना अन्य काही देशांचाही पाठिंबा लागेल. त्याचबरोबर भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचा सामना न खेळायचे ठरवले तर यामध्ये भारताचेच नुकसान आहे."