चंदिगढ: माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्ली दौऱ्यानंतर पंजाबमध्ये परतले आहेत. काँग्रेस पक्ष सोडणार असून भारतीय जनता पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं. नवज्योत सिंग सिद्ध पंजाबसाठी योग्य व्यक्ती नाही. त्यामुळे त्यांनी कुठूनही निवडणूक लढवली, तरीही मी त्यांना जिंकू देणार नाही, असा निर्धार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला. मी काँग्रेस सोडतोय आणि मी आता या पक्षात नाही. पण मी भाजपमध्ये प्रवेश करत नाहीए, याचा पुनरुच्चार सिंग यांनी केला.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत सुरक्षेबद्दल काही विषयांवर चर्चा झाली. त्याच संवेदनशील मुद्द्यांचा समावेश असल्यानं त्यावर भाष्य करू शकत नाही, असं सिंग यांनी सांगितलं. पंजाबमध्ये बहुमत चाचणी होणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर एखाद्या पक्षानं बहुमत गमावल्यास विधानसभेचे अध्यक्ष हा निर्णय घेतील, असं उत्तर त्यांनी दिलं. सिद्ध पंजाबसाठी योग्य व्यक्ती नाही. त्यांनी राज्यातल्या कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, तरीही मी त्यांना जिंकू देणार नाही, असं सिंग म्हणाले.
मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळीही पंजाब काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष होते. मात्र सिद्धूंनी जे केलं, ते आधी कोणीही केलेलं नाही, असं सिंग यांनी म्हटलं. सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना त्यांनी राजीनामा पाठवला. मी कार्यकर्ता म्हणून पक्षाची सेवा करत राहीन, असं सिद्ध यांनी पत्रात नमूद केलं होतं. पंजाब सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून सिद्धू नाराज असल्याचं समजतं. त्यानंतर आज सिद्धू मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या भेटीला गेले. त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली.