नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या कामगिरीवर सरकार असमाधानी नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केले. सरकारसोबतच्या मतभेदांमुळे ऊर्जित पटेल यांनी अलीकडेच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जेटली यांचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे.रिझर्व्ह बँकेच्या कामाचे कौतुक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एका अहवालाचा हवाला जेटली यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिला. अलीकडील काही वर्षांत रिझर्व्ह बँकेच्या निगराणी आणि नियमनात सुधारणा झाली आहे, असे प्रशंसोद्गार या अहवालात नाणेनिधीने काढले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या कामावर सरकार नाखूश आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर लोकसभाध्यक्षांना उद्देशून जेटली यांनी ‘नो मॅडम’ असे उत्तर दिले. रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर ऊर्जित पटेल आणि सरकार यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. रिझर्व्ह बँकेकडे राखीव निधी किती असावा, हा वादाचा मुख्य मुद्दा होता. त्याचप्रमाणे लघु व मध्यम उद्योगांना द्यावयाच्या कर्जाविषयीचे नियम आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवरील कारवाईची कृती यावरूनही सरकार आणि पटेल यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.
रिझर्व्ह बँकेच्या कामगिरीवर असमाधानी नाही - जेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 12:53 AM