नवी दिल्ली - संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने सहा कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 97,67,372 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 31,522 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 412 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,41,772 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
लक्षद्वीपमधील जनजीवन नेहमीप्रमाणे सर्वसामान्य आहे. येथे आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. ना मास्क, ना सॅनिटायझर आणि कोविड-19 च्या इतर अनेक नियमांचा कोणताही प्रकार येथे पाहायला मिळत नाही. लग्न समारंभापासून ते इतर अनेक कार्यक्रमांतर्गत येथे लोक नेहमी सारखेच एकमेकांना भेटत आहेत. लक्षद्वीपमध्ये सर्वकाही सर्वसामान्यपणे होत आहे याचे कारण अरबी समुद्रात असलेल्या या द्वीपावर लोकांनी सहज प्रवेश करू नये म्हणून एसओपीचे अतिशय कठोरपणे पालन केले जाते.
सर्वसामान्य असो किंवा अधिकारी वा जनप्रतिनिधी, 7 दिवस क्वारंटीन राहिल्यानंतरच प्रवेश
लोकसभेत लक्षद्वीपचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार पी. पी. मोहम्मद फैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीलाच लक्षद्वीपने कोविड-19 च्या महासाथीला रोखले होते. आठ डिसेंबरपर्यंत लक्षद्वीपमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. "आम्ही घेतलेल्या काळजीमुळे आतापर्यंत लक्षद्वीपमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. कडक नियमांचे पालन केल्यानंतरच 36 वर्ग किलोमीटरच्या या द्वीपावर प्रवेश मिळू शकतो. मग ती एक सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा मग अधिकारी वा जनप्रतिनिधी. सर्वांनाच कोच्चीमध्ये सात दिवसांसाठी क्वारंटाईन राहण्याबरोबरच इतर अनेक नियमही पाळावे लागतात" असं त्यांनी म्हटलं आहे.
कोच्ची हा एक असा पॉइंट आहे जेथे जहाज किंवा मग हेलिकॉप्टरद्वारे द्वीपापर्यंत जाता येते. द्वीपावर मात्र लोकांसाठी कोणत्याही प्रकारचे नियम आणि बंधने नाहीत. ना मास्क, ना सॅनिटायझर... कारण हे एक हरित क्षेत्र असल्याची माहिती फैजल यांनी दिली आहे. लक्षद्वीप अशी एकमात्र जागा आहे जेथे शाळा सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे 21 सप्टेंबरपासून शाळा उघडण्याची परवानगी दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.