कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Virus Second Wave) देशात विविध ठिकाणी ऑक्सिजनच्या (Oxygen) कमतरतेमुळे रुग्ण दगावल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. पण केंद्रातील मोदी सरकारनं (Modi Government) आज राज्यसभेत (Rajya Sabha) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याचा दावा केला आहे. (Not a single death due to lack of oxygen in the second wave of corona', said Dr Bharti, Minister of State for Health)
काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल (KC Venugopal) यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत सरकारसमोर सवाल उपस्थित केला होता. यावर आरोग्य मंत्रालयाकडून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
"कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची नियमितपणे माहिती राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला देण्यात आलेली आहे. पण कोणत्याही राज्याने किंवा केंद्र शासित प्रदेशानं ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिलेली नाही", असं उत्तर नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यसभेत दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढल्याचं मात्र आरोग्य मंत्रालयानं मान्य केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. पहिल्या लाटेत ३,०९५ मेट्रीक टन ऑक्सिजनची मागणी होती. तर दुसऱ्या लाटेत यात दुपटीनं वाढ होऊन ९ हजार मेट्रीक टनपर्यंत पोहोचली, अशी माहिती सरकारनं संसदेत दिली.
दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारकडून २८ मेपर्यंत १०,२५० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला आहे. सर्वाधिक १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना पुरविण्यात आला, तर दिल्लीला ४०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला अशीही माहिती केंद्रानं संसदेत दिली.