नवी दिल्ली : कोरोना काळात घरात राहून-राहून कंटाळलेल्या राजधानी दिल्ली परिसरातील गुडगाव येथील काही मोजक्या नागरिकांनी आऊटिंगसह चित्रपटाचा आनंद लुटला; पण हा चित्रपट थिएटरमध्ये नव्हे तर कारमध्ये बसून त्यांनी पाहिला.‘सनसेट सिनेमा क्लब’ने रविवारी सायंकाळी राबविलेल्या या उपक्रमाची बातमी देशभर व्हायरल झाली आहे. लोकांनी घरचे खाद्यपदार्थ खाऊन तसेच मास्क घालून चित्रपटाचा आनंद लुटला. गुडगावच्या सेक्टर ५९ मधील ‘एससीसी बॅकयार्ड स्पोर्ट क्लब’च्या मैदानात स्क्रीन लावून हा चित्रपट लोकांना दाखविण्यात आला. प्रेक्षकांना बसण्यासाठी ३० कार मैदानात पार्क करण्यात आल्या. सायंकाळी ८ वाजता चित्रपटास सुरुवात झाली. कारमध्येच राहा आणि सुरक्षित अंतर ठेवा, अशा सूचना प्रोजेक्टरवर चित्रपटाआधी झळकल्या.चित्रपटाला गेलेल्या सपना वासुदेव (५०) यांनी सांगितले की, त्यांनी आम्हाला हेराफेरी हा चित्रपट दाखविला. वास्तविक आम्ही हा चित्रपट आधीच पाहिलेला आहे. तरीही आम्ही आलो. कारण याद्वारे आम्हाला सुरक्षित आऊटिंगचा आनंद घेता आला.हेच सिनेमाचे भविष्य- सनसेट सिनेमा क्लबचे सहसंस्थापक साहील कपूर यांनी सांगितले की, भविष्यातील सिनेमाचे हेच भविष्य आहे.- साऊंडसाठी आम्ही आधी वायरलेस इअरपीस देण्याचा विचार केला होता. तथापि, संपर्क नको म्हणून ८९.० रेडिओ चॅनलवर आम्ही साऊंड प्रसारित केला.- या मैदानात प्रत्येक सप्ताहाच्या अंतास अशाच प्रकारे चित्रपट दाखविला जाईल. रविवारच्या शोसाठी १,२०० रुपये तिकीट ठेवण्यात आले होते.
थिएटरमध्ये नव्हे, कारमध्ये बसून आता पाहा सिनेमा!, गुडगावात यशस्वी प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 2:34 AM