पंतप्रधानपदावर काँग्रेसचा दावा; 24 तासांत केलं घुमजाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 11:56 AM2019-05-17T11:56:51+5:302019-05-17T11:57:19+5:30
काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा आणि जुना राजकीय पक्ष आहे. जर पाच वर्षे सरकार चालवायचं असेल तर काँग्रेसला संधी दिली पाहिजे
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर निकालानंतरच्या राजकारणावर चर्चा रंगू लागली आहे. लोकसभा निकालांमध्ये भाजपाला कमी जागा मिळाल्या तर विरोधी पक्षांची एकजूट करुन पंतप्रधानपदावर दावा केला जाऊ शकतो. काँग्रेसने इतर पक्षाचा पंतप्रधान झाला तरी चालेल, एनडीए हटवणं आमचे लक्ष्य असल्याचं विधान केलं होतं. मात्र 24 तासाच्या आत काँग्रेसने या विधानावर घुमजाव केले आहे.
काँग्रेसने पंतप्रधानपदात आम्हाला स्वारस्य नाही असंही कधीही सांगितले नाही. काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा आणि जुना राजकीय पक्ष आहे. जर पाच वर्षे सरकार चालवायचं असेल तर काँग्रेसला संधी दिली पाहिजे असं विधान काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांनी करुन स्वत:च्या विधानावरुन पलटी मारली आहे.
Ghulam Nabi Azad, Congress: No, this is not true that Congress will not claim or Congress is not interested in Prime Minister post. Of course we are the biggest and oldest political party. If we have to run the govt for five years biggest political party should be given a chance. pic.twitter.com/g31TFMHtJc
— ANI (@ANI) May 17, 2019
यावेळी बोलताना गुलाब नबी आझाद म्हणाले की, निवडणुकीच्या या काळात विरोधी पक्षांनी पंतप्रधानपदावरुन कोणताही वाद उपस्थित करता कामा नये. पंतप्रधानपदाचा निर्णय सर्वसमंतीने होईल. मात्र राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक प्रबळ दावेदार आहेत असं त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, या शक्यतेमुळे मतमोजणीच्या दिवशी, २३ मे रोजी सोनिया गांधी यांनी भाजपबरोबर नसलेल्या आणि त्याचबरोबर यूपीएचे घटक असलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. निवडणूक निकालांपूर्वीच ही मोर्चेबांधणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. या बैठकीत पंतप्रधानपदाबाबत चर्चा केली जाईल.
मागील आठवड्यातही कपिल सिब्बल यांनीही काँग्रेसला 272 जागा जिंकता येणार नाहीत, हे आम्हाला माहित आहे. तसेच, भाजपालाही 160 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. पण, काँग्रेस प्रणित आघाडीचेच सरकार येईल असं विधान केलं होतं. त्यामुळे 23 मे रोजी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर होईल, असेही सिब्बल यांनी म्हटलं होतं. तर शरद पवार यांनीही मोदींचं सरकार फक्त 13 दिवस टिकेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रपतींनी मोदींना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं तरी त्या सरकारची अवस्था 1996मधल्या वाजपेयी सरकारसारखीच होईल, असं सांगितलं आहे. भाजपाविरोधात सर्व पक्षांना एकत्र आणण्याचं काम सुरू आहे. 21 मे रोजी त्याला मूर्त स्वरूप येणार असल्याचंही पवार यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान इतर पक्षाचा झाला तरी चालेल; एनडीएला हटवणं आमचं लक्ष्य - काँग्रेस #Congresshttps://t.co/tF8oa1VnfA
— Lokmat (@MiLOKMAT) May 16, 2019