कोलकाता : केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्यावरून देशभरात वातावरण तापलेले आहे. पश्चिम बंगालमध्येही आंदोलने होत आहेत. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी गोळ्या घालून ठार मारू, असे वक्तव्य केले होते. यावर ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला आहे.
घोष यांनी ममता बॅनर्जी यांना एका सभेमध्ये सवाल करताना म्हटले होते की, हे आंदोलक तुमचे मतदार असल्याने पोलिस त्यांच्याविरोधात कारवाई करत नाही. ते बाहेरून आलेले आहेत आणि मालमत्तेचे नुकसान करत आहेत. आमचे उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकचे सरकार अशा लोकांना कुत्र्यासारखे गोळ्या घालून ठार करत आहे. तुम्ही इथे आला आहात. आमचा घास खात आहात. इथेच राहून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करता. ही काय तुमची जमीनदारी आहे का? तुम्हाला लाठ्यांनी मारून, गोळ्या झाडून आणि तुरुंगात टाकावे लागेल.
यावर ममता बॅनर्जी यांनी घोष यांना सुनावले आहे. घोष यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांचे नाव घ्यायलाही लाज वाटते. तुम्ही गोळीबाराला प्रोत्साहन देत आहात. हा उत्तरप्रदेश नाही. उद्या जर काही असा प्रकार घडला तर तुम्ही तितकेच जबाबदार असणार आहात, हे लक्षात घ्या. आंदोलकांना ठार मारायच्या गोष्टी करता? अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.