कोईम्बतूर - दक्षिण रेल्वेद्वारा सुरू करण्यात आलेल्या एका नव्या सेवेचा लाभ ब्रिटीश दाम्पत्याने सर्वप्रथम घेतला. निलगिरीच्या पर्वतरांगामध्ये आपले हनिमून साजरे करण्यासाठी या ब्रिटिश दाम्पत्याने चक्क संपूर्ण रेल्वेच बुक केली. मेतुपलयम ते उघगमंडलम या मार्गावर धावणाऱ्या या रेल्वेतील सर्वच डब्ब्यांचे बुकींग या दाम्पत्याने केले होते. ग्राहम विलियम्स (30) आणि सिल्विया प्लासिक (27) असे या नवविवाहित जोडप्याचे नाव आहे.
भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कार्पोरेशनच्या वेबसाईटवरुन ग्राहम यांनी रेल्वेचे बुकिंग केले होते. रेल्वे बोर्डाने निलगिरी पर्वतरांगातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष रेल्वेसेवा सुरु केली आहे. या विशेष रेल्वेमध्ये 120 प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था आहे. या ब्रिटीश दाम्पत्याने ही पूर्ण रेल्वेच बुक केली. त्यामुळे या चार्टर सेवेचा लाभ घेण्याचा पहिला मान या दाम्पत्याला मिळाला आहे. शुक्रवारी मेत्तुपलयम आणि कन्नूर येथे रेल्वे व्यवस्थापकांनी या नवदाम्पत्याचे स्वागत केले. सकाळी 9.10 वाजता मेत्तुपलयम येथून निघालेली ही रेल्वे दुपारी 2.40 वाजता उटी येथे पोहोचली होती. पर्वती पर्यटनास चालना देण्यासाठी रेल्वेने या विशेष रेल्वेसेवेला मान्यता दिली आहे. निलगिरी माऊंटन रेल्वे स्थानकावरुन सुटणाऱ्या या रेल्वेची बैठक क्षमता 120 एवढी आहे. दरम्यान, नुकताच विवाह पार पडलेले हे ब्रिटीश दाम्पत्य हनिमून साजरा करण्यासाठी भारतात आले आहे.