चलनातून बाद करण्यात आलेल्या हजार-पाचशेच्या नोटा बदलून घेण्यास गुरुवारी देशभरातील बँकांमध्ये रेटारेटी सुरू होती. नवी दिल्ली : बंद करण्यात आलेल्या हजार-पाचशेच्या नोटा बदलून घेण्यासाठी गुरुवारी देशभरातील बँकांत नागरिकांनी तुफान गर्दी केली. त्यामुळे तिथे रेटारेटीप्रमाणे नोटारेटीच सुरू झाली. सरकारी, खासगी तसेच सहकारी बँकांच्या सर्वच शाखांबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. गर्दीमुळे गोंधळ उडू नये, म्हणून सर्व बँकांपाशी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांचा आजचा दिवस बँकांपुढे उभे राहण्यातच गेला.अनेक जणांना १00 रुपयांच्या नोटा हव्या होत्या, काहींना आपल्या खात्यातून १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढायची होती, तर अनेक जण आपल्याकडील ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा खात्यात जमा करायला आले होते. सर्वांत जास्त गर्दी ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी होती. आमच्या खात्यात आज रक्कम जमा करायला आलो असून, आम्ही ती उद्या काढणार आहोत, असे अनेकांनी बोलून दाखवले. बाद झालेल्या नोटा लवकरात लवकर परत बँकेत जमा करण्यासाठी तिथे झुंबडच उडाली होती. त्यासाठी कित्येकांनी आज रजाच टाकल्या.एटीएम आज बंद होती. तिथे उद्यापासून पैसे मिळणे सुरू होणार असले तरी तिथेही गर्दी उसळेल आणि तिथेही रक्कम मिळेल, याची खात्री नाही. त्यामुळे आम्ही आजच पैसे काढायला आलो. चार हजार रुपये मिळाले. त्यात आठवडा तरी जाईल, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. त्यासाठी काहींना दोन तास तर कित्येकांना चार-चार तास रांगेत उभे राहावे लागले. शंभराच्या किंवा नव्या नोटा हातात येताच, त्यांच्या चेहऱ्यावर युद्ध जिंकल्याचाच आनंद दिसत होता. काही बँकांत मात्र दुपारनंतर १00च्या नोटाच शिल्लक राहिल्या नाहीत. त्या बँकांनी ग्राहकांना उद्या यायला सांगितले. स्वत:च्या खात्यातून रक्कम काढणाऱ्यांना मात्र १0 हजार रुपये मिळू शकले. मात्र त्यांना आता आठवडाभर बँकेतून वा एटीएममधून एकही पैसा काढता येणार नाही. सोनेखरेदीवर करडी नजरहजार-पाचशेच्या नोटा बँकेत जमा करण्यापेक्षा त्यातून मोठ्या प्रमाणावर सुवर्णालंकारांची खरेदी केली जात आहे, असे निदर्शनास आल्यावर प्राप्तिकर खाते यावर नजर ठेवणार आहे. सोने खरेदीवेळी खरेदीदाराचा पॅन नंबर घेणे सक्तीचे आहे, असे केंद्रीय महसूल सचिव डॉ. हसमुख अढिया यांनी सांगितले.नोटेसोबत काढले सेल्फीबँकांतून जुन्या नोटांच्या बदल्यात नागरिकांना २ हजाराच्या नव्या नोटा दिल्या जात होत्या. २ हजारांची नवी नोट पाहून लोक उत्साहित असल्याचे दिसून आले. अनेकांनी नव्या नोटेसोबत सेल्फी काढण्याचा आनंद लुटला. या सेल्फींची समाज माध्यमांवर दिवसभर धूम सुरू होती.शनिवार-रविवार बँका सुरू राहणारजुन्या नोटा बदलून घेण्यासाठी उसळलेली गर्दी पाहून सप्ताहाच्या अखेरीस म्हणजेच शनिवार-रविवार देशभरातील बँका सुरू राहणार आहेत. आयकर विभागाचे देशभर छापेबाद झालेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा कमिनश घेऊन बदलून देणाऱ्या मुंबई, दिल्ली, चंदीगड, लुधियानासह दक्षिणेतील दोन मोठ्या शहरांतील काही व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर आयकर विभागाने गुरुवारी सायंकाळी छापे मारले. कमिशनवर नोटा बदलून देणाऱ्या काउंटरवर काही रोख रक्कम जमा होऊन कारवाई प्रभावी सिद्ध व्हावी, यासाठी हे करण्यात आले.