नवी दिल्ली- भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी वाढ झाल्याचे २ मार्च रोजी संपलेल्या आठवड्याच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. परकीय चलनाची गंगाजळी १६७.७ अब्ज डाँलर्सने वाढून ती ४२०.७ अब्ज डाँलर्सवर जाऊन पोहोचल्याचे रिझर्व्ह बँकेने काल स्पष्ट केले. त्यापुर्वीच्या आठवड्यात ती थोडी घटून ४२०.५ इतकी झाली होती.
९ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्याने विक्रम केला होता. त्यावेळेस ४२१.९१४ अब्ज डाँलर्स इतके चलन उपलब्ध झाले होते. आजवरच्या इतिहासातील तो विक्रम होता. मागील वर्षी ८ सप्टेंबर रोजी परकीय चलनाच्या गंगाजळीने प्रथमच ४०० अब्ज डाँलर्सचा टप्पा गाठला होता. त्यानंतर तो त्याच्या आसपास वरखाली होत राहिला.
परकीय गंगाजळीबरोबर भारतीय सोन्याच्या साठ्याच्या किंमतीतही मोठी वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. सोन्याच्या साठ्याचे मूल्य ८.१ अब्ज डाँलर्सने वाढून २१.५२२ अब्ज डाँलर्स झाल्याचे बँकेने माहिती दिली आहे.