हैदराबाद - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नोटाबंदी निर्णयाच्या घोषणेनंतर जवळपास दोन वर्षांनी बँकेत परत आलेल्या नोटांचा आकडा जाहीर केला आहे. या आकडेवारीनुसार नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर बाद झालेल्या नोटांपैकी केवळ 99.30 टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. या अहवालावरुन भाजपा सरकारवर सर्व स्तरातून हल्लाबोल चढवण्यात आहे. एकीकडे भाजपावर टीकास्त्र सोडण्यात येत असताना भाजपा नेते मात्र नोटाबंदी निर्णयाचं जोरदार समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
नोटाबंदीमुळे बाथरुम आणि बिछान्याखाली लपवण्यात आलेली रोकड बाहेर आली आणि बँकेत जमा झाली, असं म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नोटाबंदी निर्णयाचं पुन्हा समर्थन केले आहे. बाद झालेल्या जवळपास सर्व नोटा बँकेमध्ये जमा झाल्या आहेत. नोटाबंदी निर्णयावरील रिझर्व्ह बँकेच्या अहवालावर लोकांना आक्षेप का आहे, असे म्हणत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
(नोटाबंदी ही चूक नव्हे, तर जनता व छोट्या व्यावसायिकांवर आक्रमण होतं- राहुल गांधी)
'जो पैसा बाथरुम आणि बिछान्याखाली लपवून ठेवण्यात येत होता. तोच पैसा बँकेत जमा झाला. बँकेत जमा झालेल्या रोकडमध्ये कितीप्रमाणात काळा पैसा होता आणि किती पांढरा पैसा होता, हे पाहणं रिझर्व्ह बँक आणि आयकर विभागाची जबाबदारी असून याची पडताळणी ते करतील', अशी प्रतिक्रिया नायडू यांनी दिली आहे.
नायडू पुढे असंही म्हणाले की, ज्या लोकांना काळा पैसा पांढरा करण्याची इच्छा अाहे त्यांच्यासाठीही संसदेने उपाय शोधला आहे. योग्य वेळेत कर भरावा आणि त्यात महसूल समाविष्ट करावा, जेणेकरुन लोकांच्या भल्यासाठी याचा वापर केला जाईल.
अमित शहा नोटाबंदीचे लाभार्थी - राहुल गांधी
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरबीआयच्या अहवालावरुन भाजपावर हल्लाबोल चढवला आहे. काही बड्या उद्योगपतींकडे असलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठीच नोटाबंदीचा उपयोग करण्यात आला. अमित शहा हेही त्याचे लाभार्थी आहेत, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला.
मोदी यांना जे उद्योगपती मदत करतात, त्यांचा फायदा पंतप्रधान या पद्धतीनं करुन देतात, असे आता उघडच झाले आहे. नोटाबंदीचा प्रयोग फसल्याचा दावा करताना ते म्हणाले की, यामुळे लोकांचा रोजगार गेला. अनेक लहान उद्योग बंद पडले. देशाचा जीडीपी 2 टक्क्यांनी घटला आणि नोटाबंदीनंतर पैशांसाठी बँकांबाहेर उभे राहिलेल्यांपैकी 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला, हे सर्वांनीच पाहिले आहे.
या नोटाबंदीमुळे काळा पैसा परत आला का, दहशतवाद्यांच्या कारवाया थांबल्या का, बनावट नोटांची छपाई बंद झाली का, असे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलेत.