अहमदाबाद - उद्या आठ नोव्हेंबर असून नोटाबंदीच्या निर्णयाला एकवर्ष पूर्ण होत आहे. आठ नोव्हेंबर भारताची अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसाठी काळा दिवस आहे अशा शब्दात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये आलेल्या मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरुन भाजपा आणि मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रचारासाठी मैदानात उतरवले आहे.
उद्या आपल्या देशाच्या जनतेवर लादण्यात आलेल्या नोटाबंदीच्या अनर्थकारी निर्णयाला एकवर्ष पूर्ण होत आहे. एकाच फटक्यात 86 टक्के चलन रद्द करण्याचा निर्णय जगातील कुठल्याही देशाने घेतलेला नाही असे मनमोहन सिंग म्हणाले. अर्थव्यवस्थेला कॅशलेस बनवण्यासाठी सक्तीचा नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे. या निर्णयाचा काहीही परिणाम झाला नाही. नोटाबंदी म्हणजे संघटीत आणि कायदेशीर लूट होती. छोटे शेतकरी आणि उद्योजकांना याचा फटका बसला असे मनमोहन सिंग म्हणाले.
नोटाबंदी आणि जीएसटी हे दोन निर्णय आपल्या अर्थव्यवस्थेसाठी मारक ठरले असून, यामुळे छोटया उद्योगांचा कण मोडला असे मनमोहन सिंग यांनी सांगितले. भारतीयांच्या नोक-यांच्या मोबदल्यात आपण चिनी वस्तूंची आयात करतोय असे मनमोहन सिंग म्हणाले. 2016-17 मध्ये आपण चीनकडून 1.96 लाख कोटी रुपयांचा माल आयात केला. 2017-18 मध्ये हेच प्रमाण वाढवून 2.41 लाख कोटी रुपये झाले असे सिंग म्हणाले. आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही 14 कोटी लोकांची गरीबी दूर केली हे अभिमानाने सांगू शकतो असे मनमोहन सिंग म्हणाले.
माल आयात करण्यामध्ये अनपेक्षित वाढ झाली असून 45 हजार कोटींपेक्षा जास्त माल आयात केला. आयातीमध्ये वर्षभरात 23 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असे मनमोहन सिंग म्हणाले. बुलेट ट्रेनबद्दल प्रश्न विचारला म्हणून आम्ही विकासविरोधी ठरतो का ?, जीएसटी, नोटाबंदीबद्दल प्रश्न विचारणे कर चुकवेगिरी ठरते का ? असा सवाल मनमोहन सिंग यांनी विचारले.