गाझियाबाद : नोटाबंदी लागू असताना घनश्याम नावाच्या येथील एका पानवाल्याच्या बँक खात्यांमध्ये ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या काळात तब्बल १७ कोटी रुपयांच्या चलनातून बाद केलेल्या नोटा भरण्यात आल्याची धक्कादायक माहिती प्राप्तिकर विभागाच्या कारवाईतून उघड झाली आहे.शहराच्या नवयुग मार्केट भागात गाझियाबाद विकास प्राधिकरणाच्या कार्यालयच्या जवळ या घनश्यामचा पानाचा ठेला आहे व त्या परिसरात त्याचे पान खूप प्रसिद्धही आहे. या घनश्यामच्या एका बँक खात्यात नोटाबंदीच्या काळात पाच कोटी रुपये जमा झाल्याचे निदर्शनास आल्यावर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला चौकशीसाठी पाचारण केले. एवढी रक्कम जमा होण्याचे इंगित घनश्यामने सांगून टाकले: दरमहा आठ हजार रुपये देण्याच्या बदल्यात रिअल इस्टेट एजंट असलेल्या राहुल चौधरी यास आपण आपल्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची परवानगी दिली होती.प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सांगितले की, घनश्यामचे बँक खाते ‘डमी’ म्हणून वापरून त्यात पैसे जमा करण्याचे उद्योग केवळ राहुल चौधरीपुरते मर्यादित असावेत असे दिसत नाही. या राहुलचा ‘मध्यस्थ’ म्हणून वापर करून दिल्ली व मेरठ येथील सुवर्णकारांसह इतरही अनेकांनी त्यांची बेहिशेबी माया घनश्यामच्या खात्यांमध्ये जमा केल्याचा संशय आहे. या सूत्रांनी सांगितले की, जम्मू काश्मीर बँकेच्या नेहरु नगर शाखेत असलेल्या घनश्यामच्या खात्यात प्रथम पाच कोटी रुपये जमा झाल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास करता याच शाखेत त्याची आणखीही दोन खाती आहेत व त्या खात्यांमध्ये मिळून नोटाबंदीच्या काळात आणखी १२ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे दिसून आले.हा अधिकारी म्हणाला की, ही दोन्ही खाती बनावट कागदपत्रांच्या मदतीने उघडण्यात आल्याचेही तपासातून समोर आले. या दोन्ही खात्यांमध्येही राहुल चौधरी हाचव्यवहार करत होता व या खात्यांमध्ये प्रामुख्याने ५०० व एक हजार रुपयांच्या बाद नोटा जमा केल्या गेल्या. राहुल चौधरी गाझियाबाद शहराच्या न्यू पंचवटी कॉलनीत राहतो. (वृत्तसंस्था)
पानवाल्याच्या खात्यांत १७ कोटींच्या बाद नोटा
By admin | Published: January 23, 2017 3:40 AM