नवी दिल्ली- दोन वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली होती. या निर्णयानंतर देशातील 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. आज नोटाबंदीला दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षांनी मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. तर सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला संकुचित विचारांनी घेतलेला अपशकुनी निर्णय, असं संबोधलं आहे. नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याचं आता समोर आलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य व्यक्ती प्रभावित झाल्या. मग ते कोणत्या धर्म, जाती किंवा पेशा, संप्रदायाचे असो. असं म्हणतात, एखादी जखम झाल्यास ती भरून निघते, परंतु नोटाबंदीमुळे झालेली जखम दिवसेंदिवस अजून खोलवर जाताना दिसत आहे. नोटाबंदीमुळे जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. छोटे छोटे उद्योगधंदे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा होता. तो नोटाबंदीमुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाला. अर्थव्यवस्था दिवसेंदिवस घसरताना पाहायला मिळतेय.तरुणांना नोक-या नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारं कर्ज आणि बँक, गैर वित्तीय संस्थांवर नोटाबंदीचा दुष्परिणाम झाला आहे. नोटाबंदीमुळेच रुपयाचा स्तर खाली येताना पाहायला मिळतोय, असं मनमोहन सिंग म्हणाले आहेत.
Notes Ban Anniversary: मनमोहन सिंग म्हणाले, नोटाबंदी हा अपशकुनी निर्णय, जेटलींचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 3:55 PM