नवी दिल्ली : गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी एक हजार व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या गेल्यानंतर, आता ज्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे, अशा ३५ हजार ‘शेल’ कंपन्यांनी या बाद नोटा बँकांमध्ये भरण्याचे किंवा काढण्याचे १७ हजार कोटी रुपयांचे व्यवहार केले, असे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे.कंपनी व्यवहार मंत्रालयाने ही माहिती देताना रविवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले की, दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ पूर्णपणे निष्क्रिय राहिलेल्या सुमारे २.२४ लाख कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली. त्यापैकी काही कंपन्या, दुसºयांचे व्यवहार करण्यासाठी केवळ कागदोपत्री स्थापन केलेल्या ‘शेल’ कंपन्या असाव्यात, असा संशय आहे.या कंपन्यांच्या प्राथमिक तपासात त्यांनी नोटाबंदीनंतर बाद नोटांचे १७ हजार कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचे उघड झाले. यापैकी एका कंपनीची बँकांमध्ये तब्बल २,१३४ खाती असल्याचे आढळले. आणखी एका कंपनीने उणे शिलकीने उघडलेल्या खात्यात नोटाबंदीनंतर पैसे भरण्याचे व काढण्याचे २,४८४ कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले. ५६ बँकांकडून ३५ हजार कंपन्या आणि त्यांच्या ५८ हजार खात्यांविषयी जी माहिती मिळाली, त्याआधारे या कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली, असे मंत्रालयाने म्हटले आहे.कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने दरवर्षी त्यांचे ताळेबंद किंवा वार्षिक वित्तीय अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. ज्या कंपन्यांनी सलग तीन वर्षे याचे उल्लंघन केले, अशा कंपन्यांच्या ३.०९ लाख संचालकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. एक व्यक्ती जास्तीतजास्त किती कंपन्यांची संचालक राहू शकते, यालाही कायद्याचे बंधन आहे. प्राथमिक तपासातून असे दिसते की, अपात्र घोषित केल्या गेलेल्यांपैकी ३,००० संचालक एकाच वेळी प्रत्येकी २० हून अधिक कंपन्यांचे संचालक होते.
१७ हजार कोटींच्या बाद नोटांचा केला व्यवहार, एका कंपनीची आढळली २,१३४ खाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:18 AM