नवी दिल्ली-
दिल्लीत संत ईश्वर सन्मान २०२१ कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यात भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासापासून विकासाच्या मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. यावेळी भागवत यांनी जय श्री रामचे नारे लगावणाऱ्यांचे कान टोचण्याचंही काम केलं. "जय श्री रामचा नारा आपण मोठ्या जोशात देतो. नारेबाजी करण्यात काहीच गैर नाही. पण भगवान राम यांच्यासारखं आपलंही आचरण असायला हवं", असं मोहन भागवत म्हणाले.
"गेल्या ७५ वर्षांमध्ये आपला देश ज्यापद्धतीनं पुढे जायला हवा होता. त्यापद्धतीनं काही आपला विकास झालेला नाही. देशाला विकासाच्या मार्गावर आपण आणलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. पण इतकी वर्ष तसं झालं नाही त्यामुळेच आपण पुढे जाऊ शकलो नाही", असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.
दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये संत ईश्वर सन्मान संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनात समाजाची निस्वार्थ भावनेनं सेवा केलेल्या संघटना आणि व्यक्तींचा आज मोहन भागवत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन संत ईश्वर फाऊंडेशनच्यावतीनं आणि राष्ट्रीय सेवा भारतीच्या सहयोगानं करण्यात आलं होतं. यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
"जगातील सर्व देशांचे मिळून आतापर्यंत जितके महापुरूष झाले असतील तितके महापुरूष गेल्या २०० वर्षात एकट्या भारतात झाले आहेत. या प्रत्येक महापुरूषाचं जीवन आज प्रत्येकाच्या सर्वांगीण जीवनाला सकारात्मक ऊर्जा देणारं आहे. खोटं जगात कधीच टीकत नाही. असत्यानं कितीही प्रयत्न केला तरी विजय नेहमी सत्याचाच होतो", असंही मोहन भागवत म्हणाले.