लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : हिंडेनबर्ग-अदानी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. मात्र, यामध्ये भाजपसाठी लपवण्यासारखे काही नाही आणि घाबरण्याची गरज नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी प्रथमच स्पष्ट केले आहे.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या प्रकरणावर बाजू मांडली. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींसह विरोधकांनी भाजपवर अदानींना संरक्षण दिल्याचा आरोप केला होता. याबाबत संसद ते रस्त्यावर निदर्शनेही करण्यात आली. मुलाखतीदरम्यान शहा यांनी लोकसभा निवडणुका, पीएफआयवर बंदी, ईशान्येतील निवडणुका, देशाची अंतर्गत सुरक्षा, शहरांचे नामांतर आणि जी-२० अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
२०२४ मध्ये कोणतीही स्पर्धा नाही‘मला विश्वास आहे की, २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी कोणतीही स्पर्धा नाही. पंतप्रधान मोदींना जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे. आजवर जनतेने लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्षाचे लेबल कोणालाही दिलेले नाही, असेही ते म्हणाले.
...मग कोर्टात जा?सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे या आरोपांवर शहा म्हणाले की, ते कोर्टात का जात नाहीत? जेव्हा पेगाससचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा मी त्यांना न्यायालयात जाण्यास सांगितले, परंतु त्यांनी तसे केले नाही. ते २००२ पासून मोदींच्या मागे आहेत. हजारो कारस्थाने करूनही सत्य बाहेर येतेच. प्रत्येक वेळी मोदीजी अधिक मजबूत होत आहेत.
आता दहशतवादी हल्ले कमी झाले : पीएफआय देशात धर्मांधता वाढवत होती. एक प्रकारे दहशतवादी तयार केले जात होते. दहशतवादी हल्ले कमी होत आहेत, यावरून जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीही चांगली असल्याचे सिद्ध झाले आहे, असे शहा म्हणाले.
खलिस्तानवर आमचे बारीक लक्ष : खलिस्तानचा मुद्दा वाढू देणार नाही. आम्ही त्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत. पंजाब सरकारशीही चर्चा केली आहे. विविध यंत्रणांमध्ये चांगला समन्वय आहे. मला खात्री आहे की आम्ही खलिस्तानचा मुद्दा वाढू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केेले.