नवी दिल्ली : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मुंबईत कालिना येथे कंपनीने उपलब्ध करून दिलेली निवासस्थाने (अपार्टमेंट्स) ६ महिन्यांत रिकामी करण्यास सांगण्यात आल्यानंतर एअर इंडिया युनियन्सनी संपाची नोटीस दिली आहे.
मुंबई विभागीय कामगार आयुक्तांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. एअर इंडियाचे खासगीकरण झाल्यामुळे निवासस्थाने सोडण्यास सांगण्यात आले आहे. प्रमाणित पद्धतीनुसार कोणत्याही संघटनेने संप करण्याआधी २ आठवड्यांची नोटीस देणे आवश्यक असते. त्यामुळे संयुक्त कृती समितीने २ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जात असल्याचा दावा नोटिसीत केला आहे. ५ ऑक्टोबर रोजी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना एअरलाईनकडून पत्र मिळाले. २० ऑक्टोबरपर्यंत कंपनीला कर्मचाऱ्यांनी आम्ही कंपनीने दिलेली घरे ६ महिन्यांच्या आत रिकामी करीत आहोत, असे लेखी कळवायचे आहे. एअर इंडिया युनियन्स संयुक्त कृती समितीत एअर कार्पोरेशन एम्प्लॉईज युनियन एव्हिएशन इंडस्ट्री एम्प्लॉईज गिल्ड आणि ऑल इंडिया सर्व्हिस इंजिनियर असोसिएशनचा समावेश आहे.
... तर कर्मचारी, कुटुंबीय रस्त्यावर येतीलमहाव्यवस्थापक (औद्योगिक संबंध) मीनाक्षी काश्यप यांना दिलेल्या पत्रात युनियन्सनी म्हटले आहे की. “मुंबईत ज्यांना घरे नाहीत आणि ज्यांना घरभाडे भत्ता दिला जात नाही त्या कर्मचाऱ्यांना निवासस्थाने दिले गेली आहेत. सेवा नियमांनुसार हे कर्मचारी सेवेत आहेत तोपर्यंत निवासस्थान मिळण्यास कायदेशीररीत्या पात्र आहेत. जर त्यांना बेघर व्हावे लागले तर नोकरीच्या शेवटी ते आणि त्यांचे कुटुंबीय थेट रस्त्यांवर येतील. घरे रिकामी करण्याची नोटीस हे अनुचित कामगार प्रथा असल्याचे पत्रात म्हटले आहे. सामान्यत: कर्मचारी कुटुंबीयांसह निवृत्तीपर्यंत कॉलन्यांत राहतात. त्यांना एकतर्फी बेघर करणे हे त्यांच्या सेवाशर्तीचा भंग करणे व कायदेशीर हक्क नाकारणेच होय, असेही पत्रात म्हटले आहे.