पणजी : मटक्याचे आकडे छापणाऱ्या ‘दैनिक तरुण भारत’ व ‘दैनिक पुढारी’ या गोव्यातील वृत्तपत्रांना गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रँच) गुरुवारी नोटीस बजावून लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने ३१ आॅगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार, राजरोसपणे मटका चालविणाऱ्या ११०० बुकींसह मटक्याचे आकडे छापणाऱ्या ‘पुढारी’ व ‘तरुण भारत’ या वृत्तपत्रांवर पोलिसांनी ८ आॅक्टोबर रोजी गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, त्या अनुषंगाने पहिली नोटीस गोव्यातील या वृत्तपत्रांना पाठविण्यात आली आहे. दोन्ही वृत्तपत्रांना विशिष्ट कागदपत्रे सादर करण्यासही सांगितले आहे. गरज पडल्यास वृत्तपत्रांच्या कार्यालयात झडती घेण्याचीही शक्यता या विभागातर्फे व्यक्त करण्यात आली.राजकीय पाठबळ आणि हप्तेशाहीमुळे जुगार चालकांना कोणाचेही भय उरलेले नाही. शिवाय, वृत्तपत्रांमधून मटक्याचे आकडे प्रसिद्ध होत असल्याने, या जुगाराचा प्रसार वेगाने होण्यास हातभार लागत आहे. या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी माहिती हक्क कार्यकर्ते आणि वीज खात्याचे कर्मचारी काशिनाथ शेट्ये (रा. रायबंदर-गोवा) यांनी पणजी खंडपीठात एप्रिलमध्ये जनहित याचिका केली होती. (प्रतिनिधी)कात्रणांआधारे चौकशीमटक्याचे आकडे ‘तरुण भारत’ व ‘पुढारी’ या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केले जातात, असे सांगत काशिनाथ शेट्ये यांनी वृत्तपत्रांची कात्रणेही पुराव्यादाखल याचिकेत जोडली होती. गुन्हा अन्वेषण विभागाकडून सुरू झालेली चौकशी या कात्रणांच्या आधारे होणार आहे. त्याचे स्पष्टीकरण दोन्ही वृत्तपत्रांना द्यावे लागणार आहे.अपूर्ण नावे, अपूर्ण पत्ते... या प्रकरणाची चौकशी वेग घेत असली, तरी सर्व संशयितांपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. मटका चालक म्हणून जी नावे दिली आहेत, ती अपूर्ण आणि पूर्ण पत्त्याशिवाय आहेत. ११०० मटका बुकींची नावे दिलेली नाहीत. केवळ ‘दैनिक तरुण भारत’ व ‘दैनिक पुढारी’ या दोन वृत्तपत्रांचाच स्पष्टपणे उल्लेख आहे.
‘दैनिक पुढारी’ आणि ‘तरुण भारत’ला नोटीस
By admin | Published: October 16, 2015 3:44 AM