ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १५ - झाडूवाल्या नेत्यावर विशेष कार्यक्रम दाखवल्याने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एका गुजराती चॅनलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सन्मानजनक पदावर बसलेल्या व्यक्तीवर कार्यक्रम दाखवलेल्या व्यक्तीवर कार्यक्रम दाखवल्याने ही नोटीस पाठवल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
गुजरातमधील जीएसटीव्ही या वाहिनीने महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला एक कार्यक्रम चालवला होता. गांधीच्या हत्येची जबाबदारी कोणाची ? असे या कार्यक्रमाचे नाव होते व त्याचा कालावधी अर्धा तासाचा होता. या वृत्तामध्ये नथुराम गोडसेंचे मंदिर बांधण्याच्या कृतीवर जोरदार टीका करण्यात आली होती. ' हिंदूत्ववादी संघटनांच्या या कृतीवर लगाम न ठेवणा-या सरकारचा आम्ही निषेध करतो. झाडू हातात घेऊन किंवा महागडे सुटबूट घालून गांधींच्या विचारधारेवर चालता येत नाही' असे या वृत्तात म्हटले होते. या
वृत्तवाहिनीने महात्मा गांधी व संबंधीत नेत्याची तुलना केली होती. महात्मा गांधी अत्यंत साधेपणाने राहायचे, पण हे नेते महागडे सूट व महागड्या गाड्यांमध्ये फिरतात असा उल्लेखही या बातमीत होता. गांधीजींच्या नावाने स्वच्छता मोहीम राबवली पण खरंच गांधीजींच्या विचारांचे पालन करता का असा थेट सवालही विचारण्यात आला होता.
माहिती व प्रसारण मंत्रालयाने या वृत्तवाहिनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीत वृत्तवाहिनीने कोणाचा अवमान केला याविषयी कोणाचाही थेट उल्लेख करण्यात आलेला नाही. वृत्तवाहिनीने सन्मानजनक पदावर बसलेल्या नेत्याचा अवमान केला असून जाणूनबुजून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या वृत्तातून होताना दिसतो' असे या नोटीसीमध्ये म्हटले आहे. दरम्यान वृत्तवाहिनीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी सुरु केल्याचा आरोपही वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ अधिका-यांनी केला आहे.