ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या विस्तीर्ण प्रांगणात विविध ठिकाणी डेंगीच्या डासांची उत्पत्ती होत असल्याने नवी दिल्ली महापालिकेने गेल्या महिनाभरात राष्ट्रपती भवनाला तब्बल ८० वेळा नोटीस बजावली आहे.
राष्ट्रपती भवनाचा परिसर विस्तीर्ण असून भवनातील कर्मचा-यांच्या निवासस्थानांजवळ मोठ्या प्रमाणात डेगी डासांची उत्पत्तीस्थानं आढळली आहेत. यासंदर्भात आम्ही राष्ट्रपती भवनाच्या प्रशासकीय विभागाला गेल्या महिनाभरात ८० वेळा नोटीस बजावली आहे अशी माहिती नवी दिल्ली महापालिकेतील सूत्रांनी दिली. यासंदर्भात महापालिकेने चार सदस्यांचे पथक नेमले आहे. हे पथक डासाच्या उत्पत्तीस्थानावर नियंत्रण मिळवणे, या स्थानांवर औषधांची फवारणी करणे यासाठी मोहीम राबवेल अशी माहितीही अधिका-यांनी दिली.
दिल्लीतील एम्स, सफदरगंज, राममनोहर लोहिया यासारख्या चार ख्यातनाम रुग्णांना डासांचे उत्पत्तीस्थान आढळल्याप्रकरणी दंड ठोठावल्याचे अधिका-यांनी सांगितले.