सनी देओल यांची खासदारकी धोक्यात; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 03:11 PM2019-06-19T15:11:21+5:302019-06-19T15:32:26+5:30
निवडणूक आयोगानुसार आरपी १९५१ च्या कलम ७७ नुसार उमेदवाराने निर्धारित रक्कमेपेक्षा अधिक खर्च करून ती माहिती लपविल्यास संबंधित विजयी उमेदवाराचे सदस्यत्व रद्द करण्यात येते.
नवी दिल्ली - पंजाबमधील गुरुदासपूरमधून विजय मिळविणारे अभिनेता सनी देओल यांची लोकसभेची खासदारी धोक्यात आली आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा उमेदवारासाठी निवडणुकीत ७० लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा घालून दिली आहे. मात्र ही मर्यादा उमेदवाराने पाळली नसल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येते. तर कधी विजयी खासदारचे सदस्यत्व देखील रद्द करण्यात येते. भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सनी देओल यांच्या बाबतीत असच काहीस झालं आहे.
लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवारीने ७० लाखांहून अधिक खर्च केल्याचे समोर आल्यास त्याचे सदस्यत्व रद्द करून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येते. गुरुदासपूरमधून विजय झालेल्या सनी देओल यांनी निवडणुकीत ८६ लाख रुपये खर्च केल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या पर्यवेक्षकांनी सनी देओल यांच्याकडे निवडणूक खर्चाचा तपशील मागितला आहे.
दुसरीकडे सनी देओल यांच्या वकिलाने म्हटले की, निवडणूक आयोगाच्या टीमकडून हिशोब करण्यात चूक झाली असून निवडणूक आयोगच्या टीमकडून सर्व चौकशी झाल्यानंतर यासंदर्भातील माहिती समोर येणारच आहे.
गुरुदासपूर मतदार संघातू दुसऱ्या स्थानी असलेल्या काँग्रेसच्या सुनील जाखड यांनी ६३ लाख रुपये खर्च केले आहेत. तर आपचे उमेदवार पीटर मसीह यांनी सात लाख ६५ हजार रुपये खर्च केले असून लालचंद कटारुचक्क यांनी ९ लाख ६२ हजार रुपये निवडणूक प्रचारात खर्च केले आहेत.
खर्च लपविल्यास सदस्यता होते रद्द
निवडणूक आयोगानुसार आरपी १९५१ च्या कलम ७७ नुसार उमेदवाराने निर्धारित रक्कमेपेक्षा अधिक खर्च करून ती माहिती लपविल्यास संबंधित विजयी उमेदवाराचे सदस्यत्व रद्द करण्यात येते. त्यावर सुनील जाखड यांनी म्हटले की, सनी देओल यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचं सदस्यत्व रद्द करावे.