नवी दिल्ली : राजस्थान आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या भाजपच्या सर्व खासदारांनीखासदारकीचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, आता सुत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा आवास समितीने विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या सर्व खासदारांना ३० दिवसांत सरकारी निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस दिल्याचे सांगण्यात येत आहे.
आठ खासदार सामान्य पूलचा भाग आहेत. तीन खासदार मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना नगरविकास मंत्रालयाकडून बंगल्याचे वाटप केले जाते. सूत्रांचे म्हणणे आहे की, नियम सर्वांसाठी समान आहेत, केवळ विरोधी खासदारांसाठीच नाही. ज्या लोकसभा खासदारांना ३० दिवसांच्या आत घरे रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये राकेश सिंह, अरुण साव, गोमती साय, रिती पाठक, बाबा बालकनाथ, राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी आणि उदय प्रताप सिंग या नावांचा समावेश आहे.
छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २१ खासदारांना उभे केले होते, त्यापैकी १२ खासदार विधानसभा निवडणुका जिंकण्यात यशस्वी ठरले होते. निवडणुकीत विजयी झालेल्या या खासदारांमध्ये राजस्थानमधून राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी, किरोडी लाल मीना आणि बाबा बालकनाथ आहेत. तर छत्तीसगडमधून अरुण साव, रेणुका सिंह, गोमती साई आहेत. तसेच, मध्य प्रदेशामधून नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, राकेश सिंह, उदय प्रताप आणि रिती पाठक यांचा समावेश आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीच्या लुटियन झोनमध्ये टाईप ६ पासून टाइप ८ पर्यंतचे सरकारी बंगले खासदार, केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांना दिले जातात. कोणत्या खासदाराला कोणत्या प्रकारचा बंगला मिळणार हे त्याच्या ज्येष्ठतेवर अवलंबून असते. खासदारांनी राजीनामा दिल्यास त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत हे बंगले रिकामे करावे लागतील. मात्र, ३० दिवसांच्या नोटीसनंतरही संबंधित खासदार त्या बंगल्यात काही काळ राहू शकतो, मात्र त्यासाठी त्यांना बाजारभावानुसार भाडे द्यावे लागते.