नवी दिल्ली : बलात्कारपीडित एका मुलीची भारत जोडो यात्रा करताना भेट झाली होती. तिच्यावर झालेल्या अत्याचाराची पोलिसांत तक्रार करण्यास ती राजी नव्हती, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रीनगर येथे सांगितले हाेते. या मुलीची माहिती द्यावी, अशी नोटीस दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना पाठविली आहे. या मुलीला सुरक्षा पुरवायची आहे, असे कारण दिल्ली पोलिसांनी दिले आहे.
नोटिसीबद्दल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अदानी, हिंडेनबर्ग प्रकरणी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे केंद्र सरकार घाबरले आहे. भारत जोडो यात्रा समाप्त होऊन आता ४५ दिवस झाले. त्यानंतर आता पोलिसांना बलात्कारपीडित मुलीचा मुद्दा आठवला आहे. पोलिसांच्या नोटिसीला योग्य वेळी उत्तर दिले जाईल. (वृत्तसंस्था)