नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जामा मस्जीदच्या इमाम यांनी वादग्रस्त निर्णय घेतला आहे. त्यानुसार, या मस्जीदमध्ये महिलांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. मस्जीदच्या नोटीस बोर्डवर संदेश लिहिण्यात आला. त्यामध्ये, जामा मस्जीदमध्ये मुलगी किंवा मुलींचे एकट्याने येणे बंधनकारक आहे. मुलींसमवेत पुरुष पालक नसतील तर महिलांना येथे प्रवेश नाही, असे या बोर्डवर म्हटले आहे. त्यावरुन, आता वाद निर्माण झाला असून महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या निर्णयाची दखल घेतली आहे.
स्वाती मालीवाल यांनी ट्विट करुन दिल्लीतील जामा मस्जीदच्या इमाम यांना नोटीस बजावण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. महिलांना मस्जीदमध्ये जाण्यापासून थांबवणे चुकीचे आहे. इबादत करण्याचा जेवढा हक्क पुरुषांना आहे, तितकाच हक्क महिलांनाही आहे. त्यामुळे, जामा मस्जीदच्या इमाम यांना नोटीस बजावत आहे. महिलांना अशाप्रकारे प्रवेश बंदी करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे मालीवाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मस्जीद परिसरात अश्लीलता रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. जामा मस्जीदचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. नमाज पढण्यास येणाऱ्या महिलांना प्रवेश बंदी नाही. तर, अशा तक्रारी येत आहेत, की काही मुली आपल्या प्रेमींसोबत मस्जीदमध्ये येतात. त्यामुळे, अशा मुलींना प्रवेश बंद करण्यात आला आहे. शाही इमाम यांनी स्पष्ट केले की, जर एखाद्या महिलेस जामा मस्जिदमध्ये यायचं असेल तर त्यांना कुटुंब किंवा घरातील पुरुष व्यक्तीसोबत यावे लागेल.