ऑनलाइन लोकमत
चंदीडग, दि. २३ - शाहरूख खान अभिनित 'फॅन' चित्रपटात 'जबरा फॅन' हे गाणे न दाखवल्याने यशराज फिल्मस व पीव्हीआर यांना चंदीगडमधील ग्राहक निवारण न्यायालयाने नोटीस बजावली असून २७ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी एका महिलेने तिच्या मुलांच्या वतीने तक्रार नोंदवत नुकसानभरपाई म्हणून १९ लाख रुपयांची मागणी केली आहे.
प्रतीक व श्रीनिवास चांदगोठिया या तक्रारदार मुलांतर्फे त्यांची आई संगीता व वडील पंकज यांनी ही तक्रार दाखल केली आहे. 'जबरा फॅन' हे मूव्ही अॅन्थम म्हणून दाखववण्यात आलेले गाणे हे प्रत्यक्षात दिसतच नाही, असे सांगत या मुलांनी अनफेयर ट्रेड प्रॅक्टिस आणि सेवेत कमतरता असल्याचे सांगत ग्राहक निवारण मंचात तक्रार दाखल केली आहे. ' आम्ही या गाण्यामुळे खूप प्रभावित झालो होतो, पण चित्रपटातून हे गाणे कापण्यात आल्याने आम्हाला अतिशय दु:ख झाले' असे या मुलांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून आपल्याला १९ लाख रुपये तसेच तिकीटांचे २६०० रुपये आणि मानसिक त्रास झाल्याबद्दल ५०,०० रुपये देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.