- आदेश रावल
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या नियोजनानुसार २० ऑगस्ट ते २० सप्टेंबरपर्यंत पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे.
या निवडणुकीसाठी २० ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी होणार आहे. यात निवडणुकीची पूर्ण माहिती देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची तारीख, अर्ज मागे घेण्याची तारीख आणि अखेर अर्जांची छानणी करण्याची प्रक्रिया यांचा यात समावेश आहे. निवडणूक समितीने प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यांची यादी जवळपास तयार केली आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यांच्या मतदानावर ही निवडणूक होते. तर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य काँग्रेस कार्यसमितीच्या निवडणुकीत भाग घेतात.
सर्व (पीआरओ) प्रदेश रिटर्निंग ऑफिसर यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यांची यादी निवडणूक समितीला दिली आहे. ते नव्या अध्यक्षाची निवड करणार आहेत. अध्यक्षाचा कार्यकाळ पाच वर्षांसाठी असणार आहे. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर साेनिया गांधी या अंतरिम अध्यक्ष आहेत.