ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - चित्रपट निर्माता सबा दिवान यांनी जेव्हा दिल्लीजवळ ट्रेनमध्ये एका तरुणाची जमावाकडून हत्या झाल्याच्या निषेधार्थ फेसबूकवर एक पोस्ट लिहिली होती, तेव्हा त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात समर्थन मिळेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. सोशल मीडियावर त्यांनी केलेली पोस्ट आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सोबतच #NotInMyName हॅशटॅगही गेल्या तीन ते चार दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये आहे. देशभरात रॅली निघत असून मोठ्या प्रमात प्रतिसाद मिळत आहे.
हरियाणामधील फरीदाबाद जिल्ह्यात बल्लभगड येथे जुनैद नावाच्या तरुणाची जमावाने मारहाण करत हत्या केली होती. यानंतर सबा दिवान यांनी फेसबूकर यासंबंधी एक पोस्ट केली होती. पोस्टमध्ये त्यांनी देशभरात मुस्लिमांवर होणा-या हल्ल्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी दिल्लीमधील जंतर मंतरवर एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. आंदोलनासाठी नॉट इन माय नेमचा बॅनर सोबत घेऊन येण्यासही त्यांनी सांगितलं होतं.
सबा दिवान यांचं म्हणणं आहे की, "समाज आणि धर्माच्या नावे जी काही हिंसा होत आहे, त्याचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन आहे. नॉट इन माय नेमचे फलक हातात घेऊन लोक आमचा या हत्यांशी काही संबंध नसून, आम्ही याचा निषेध करतो असं सांगत आहेत"". दिल्लीमध्ये बुधवारी यासंबंधी एक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या हत्या, मारहाणीचा निषेध करण्यात आला. नॉट इन माय नेम नावाने सुरु असलेलं हे आंदोलन फक्त दिल्लीतच नाही, तर देशरातील 10 शहरांमध्ये पार पडलं.
What a powerful image from Delhi #NotInMyNamepic.twitter.com/OXBJBimEkp— Rana Ayyub (@RanaAyyub) June 28, 2017
मुस्लिमांवर होणारे हल्ले आणि हत्या यांचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. ""नॉट इन माय नेमच्या माध्यमातून लोक आपला आवाज उठवत आहे. गोरक्षक तसंत स्वयंघोषित हिंदू धर्माच्या रक्षणकर्त्यांकडून होणा-या हत्यांच्या विरोधात हा आवाज उठवला जात आहे. देशाचा एक नागरिक म्हणून कविता, संगीत किंवा मिळेल त्या माध्यमातून एकत्र येत या हत्या आणि द्वेषाचा आपल्या नावे जो वापर होत आहे त्याचा विरोध केला पाहिजे"", असं सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा कपूर यांनी सांगितलं आहे. कोलकातामध्ये आंदोलन करण्यासाठी अनुराधा कपूर यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी एक फेसबूक पेज तयार केलं आहे.
From "Terror has NO Religion" To "Stand Up to Hindu Terrorism" - We really have come a long way!#NotInMyNamepic.twitter.com/YyCs4p21PA— Legion (@legion__group) June 29, 2017
सबा दिवान यांनी बुधवारी यासंबंधी अजून एक पोस्ट केली. ""मी एकटी नाही आहे. मी या आंदोलनाचा एक छोटासा भाग आहे, जे आता हजारो लोकांनी हाती घेतलं आहे. अनेक अनोळखी लोक एकत्र आले आहेत. हे ते लोक आहेत ज्यांचा भारताच्या राज्यघटनेवर विश्वास आहे. हे ते लोक आहेत ज्यांचा समान वागणूक, माणुसकीवर विश्वास आहे"", असं त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे. दिल्लीशिवाय चंदिगड, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद आणि त्रिवेंद्रम येथेही हे आंदोलन पार पडणार आहे.
Sad day. All brutal acts of lynching need to be condemned. Yet Lutyens media and activists ignore Deputy SP Mohd. Ayub Pandith. #NotInMyNamepic.twitter.com/fTeijqfkXe— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) June 28, 2017
अमेरिकेत 1970 साली झालं होतं पहिलं #NotInOurName
व्हिएतनाम युद्ध झालं तेव्हा लाखोंच्या संख्येने अमेरिकेतील नागरिकांनी रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. ""तुम्ही जे युद्ध करत आहात त्याला आमचं नाव देऊ नका, त्याला आमचं अजिबात समर्थन नाही"", असं अमेरिकेतील नागरिकांनी स्पष्ट केलं होतं. भारतात सध्या सुरु असलेलं हे आंदोलन अशाच स्वरुपाचं आहे.
काश्मिरींच्या हत्येविरोधातही 2010 रोजी दिल्ली आणि इतर ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन झालं होतं.