नवी दिल्ली - पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या विशेष सुरक्षा दलाने(SPG) आता फक्त 4 लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. त्यात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ही सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. एसपीजीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सोमवारी माहिती दिली.
विशेष सुरक्षा दलामध्ये 3 हजार जवान आहेत. एसपीजीच्या कमांडोची नियुक्ती विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात प्रतिनियुक्तीवर केली जाते. सोमवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा काढून त्यांना झेड प्लस सुरक्षा देत असल्याची घोषणा केली. एसपीजी दलात प्रशिक्षित जवान असतात. त्यांना अत्याधुनिक उपकरण, वाहने यांनी सज्ज असतात. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता एसपीजी कमांडो फक्त 4 नेत्यांची सुरक्षेची जबाबदारी घेणार आहे. नरेंद्र मोदी, सोनिया गांधी आणि राहुल-प्रियंका यांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे असणार आहे.
एसपीजीचे जवान उच्च प्रशिक्षित आणि प्रोफेशनल असतात. हे जवान संपूर्ण ताकदीनिशी अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा करतात. कठीण प्रसंगाला तोंड देण्याचं सामार्थ्य या जवानांकडे असतं. या जवानांच्या नुसार नेत्यांचे सुरक्षा प्रोटोकॉल पाळले जातात. ज्या नेत्याच्या सुरक्षेची जबाबदारी असते त्याच्या दौऱ्यानुसार हे दल विशेष सुरक्षेची काळजी घेते. 24 तासापूर्वी अधिकारी त्या स्थळी पाहणी करतात जिथे हे नेते जाणार आहेत.
एसपीजी टीममध्ये स्नापर्स, बॉम्बशोधक पथकातील तज्ज्ञ असतात. हे जवान अतिमहत्वाच्या नेत्यांची सुरक्षा सावलीप्रमाणे करतात. या पथकातील जवानांची वारंवार ट्रेनिंग होत असतं. सर्व राज्यांना आदेश असतात की, एसपीजीच्या सूचनेनुसार त्यांना सहकार्य केलं जावं. अत्याधुनिक वाहनांमध्ये BMW 7 बुलेटप्रुफ गाड्या. एसयूव्ही, टाटा अशा गाड्यांचा समावेश असतो. तसेच त्यांच्याकडे रायफल्स, अंधारातही स्पष्टपणे दिसेल असा चष्मा, संवाद करण्यासाठी लागणारे उपकरण, बुलेटप्रुफ जॅकेट्स अशाप्रकारच्या अनेक वस्तू असतात. त्यामुळे एसपीजीचं सुरक्षाकवच भेदणे शत्रूसाठी खूपच धोकादायक असतं असं मानलं जातं.