लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारताच्या भूभागावर दावा करून चीन सातत्याने खाेडसाळपणा करताे. यावेळी नेपाळने असा खाेडसाळपणा केला आहे. नेपाळने त्यांच्या चलनातील १०० रुपयांच्या नाेटेवर एक नकाशा छापला आहे. त्यावरून वाद निर्माण झाला असून, राष्ट्रपती रामचंद्र पाैडेल यांचे आर्थिक सल्लागार चिरंजीवी नेपाल यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी नव्या नाेटेवर नकाशा छापण्यावरून टीका केली हाेती.
नेपाळच्या संसदेने जून २०२० मध्ये नव्या नकाशाला मंजुरी दिली हाेती. त्यात भारताच्या नियंत्रणातील लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रदेशावरून भारत आणि नेपाळमध्ये वाद सुरू आहे. या नकाशावर भारताने त्यावेळी आक्षेप नाेंदविला हाेता. मात्र, १०० रुपयांची नाेट भारतीय सीमेजवळदेखील चलनात येतात. भारताने नेपाळच्या नाेटांना मान्यता दिलेली नाही.
काय आहे प्रकरण?
१०० रुपयांच्या नाेटेवर छापलेल्या नकाशामध्ये लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. हे एक अविवेकी पाऊल असल्याचे चिरंजीवी म्हणाले हाेते.