नवी दिल्ली, दि. 15 - आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सोबत लिंक केलं जाणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे. हे कधीपर्यंत केलं जाणार आहे हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डमुळे गोपनीयतेचे उल्लंघन होते की नाही यावर निर्णय दिलेला नाही. त्याआधी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे.
नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सबोत लिंक करणं हा सरकारचा अजेंडा असला तरी त्याची अंमलबजावणी करणं कितपत शक्य आहे हे पहावं लागेल.
'आम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डसोबत लिंक करण्याचं प्लानिंग करत आहोत. यासंबंधी मी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे', अशी माहिती मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे. डिजिटल हरियाणा समिट 2017 मध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 'पैशांची अफरातफर रोखण्याच्या दृष्टीने पॅनकार्ड आधारशी लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता', असंही रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं.
आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढआधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यसाठी सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. याआधी सरकारने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ देत ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत दिली होती. आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केलं नाही तर पॅन कार्ड रद्द होऊ शकते. त्यामुळे नवीन पॅन कार्ड बनवावे लागू शकते. यासोबतच जर तुम्ही रद्द झालेल्या पॅन क्रमांकाच्या माध्यमातून इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल केल्यास तेही मान्य होणार नाही.
मृत्यूनंतरही आधारची सक्तीमृत्यू प्रमाणपत्रासाठीही आधारची सक्ती करण्यात आली आहे. सर्व राज्यातील नागरिकांसाठी ही सक्ती करण्यात आली असून जम्मू काश्मीर, मेघालय आणि आसामला या निर्णयातून वगळण्यात आलं आहे. 1 ऑक्टोबर 2017 पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.
जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यात आला असेल, तर अर्जदाराला मृत्यू झालेल्या व्यक्तीचं आधार कार्ड सादर करावं लागणार आहे, नाहीतर किमान आधार क्रमांक माहिती असणं गरजेचं असणार आहे. जर मृत्यू झालेल्या व्यक्तीने आधार कार्ड काढलंच नसेल तर मग तसं प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आपल्या आदेशात ही माहिती दिली आहे. जर एखाद्याने खोटी माहिती दिली तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही गृहमंत्रालयाकडून देण्यात आला आहे.
कशी तपासणार आधार कार्डची वैधता ? आधार रद्द केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अनेकांना चुकून स्वतःचे आधारकार्ड रद्द झालेले नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. मात्र टेन्शन घेऊ नका. आधार कार्ड रद्द झाले आहे की नाही? हे अगदी काही वेळेतच तुम्ही ऑनलाइन तपासून पाहू शकता. \- आधार नंबर अॅक्टिव्ह आहे की नाही, हे पाहण्यासाठी काही स्टेप्स. सर्वप्रथम UIDAIच्या संकेतस्थळावर जा. https://uidai.gov.in/ ही आहे लिंक.- ही लिंक तुम्हाला नव्या पेजवर घेऊन जाईल. ओपन झालेल्या पेजवर आधार कार्ड नंबरची माहिती मागितली जाईल. आधार कार्डनंबर टाका. तुम्ही एक सुरक्षित कोड टाका आणि व्हेरीफायवर क्लिक करा.- Verify वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. येथे लिहीलेला आधार नंबर ****** Exists. त्यानंतर त्याच्या खाली तुमचे वय आणि तुमचा मोबाईल नंबरची माहिती असेल. हे सर्व तुम्ही लिहिले असेल तर तुमचे आधार कार्ड अधिकृत असेल आणि ते रद्द झालेले नसेल.- यानंतर ओपन होणा-या पुढील विंडोमध्ये तुम्हाला तुमचे पॅन कार्ड रद्द केले आहे की केलेले नाही, याची माहिती उपलब्ध होईल.