आगरा- संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. पद्मावती सिनेमानंतर आणखी एक सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेम ऑफ अयोध्या या सिनेमावरून वादाला सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्त्या अमित गोस्वामी याने गेम ऑफ अयोध्या या सिनेमाच्या दिग्दर्शताचे हात कापणाऱ्याला एक लाख रूपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. हा सिनेमा लोक दलाचे नेते व माजी आमदार सुनील सिंह यांनी बनविली आहे.
गेम ऑफ अयोध्या हा सिनेमा 8 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनावर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली होती. पण या सिनेमाला फिल्म सर्टिफिकेशन अपिलेट ट्रिब्यूनलने मंजुरी दिली. हा सिनेमा बाबरी मशिद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला आहे. सुनील सिंह स्वस्तातील प्रसिद्धी मिळविण्यासाठी सगळं करत असल्याचा आरोप अमित गोस्वामी यांनी केला आहे. यामध्ये काही दृश्य वाईट प्रकारने दाखविण्यात आल्याचा आरोप अमित गोस्वामी यांनी केला आहे.
सिनेमाच्या दिग्दर्शकाचे हात जो कापून आणेल त्याला 1 लाख रूपये बक्षीस दिलं जाईल. आपली न्यायव्यवस्था कोणालाही धर्माच्या भावनांशी खेळण्याची परवानगी देत नाहीत, असं गोस्वामी यांनी म्हंटलं आहे.
जर हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि काही घटना घडली तर त्यासाठी प्रशासन आणि सरकार दोघे जबाबदार असतील. उत्तर प्रदेश सरकारने सिनेमाच्या प्रदर्शनावर पुन्हा एकदा विचार करायला हवा. जर हा सिनेमा अलीगढमध्ये प्रदर्शित झाला तर युवा नेते आणि विद्यार्थी त्याला विरोध करतील. जर सुनील सिंह कुठे दिसले तर त्यांना मारून टाकलं जाईल, असंही अमित गोस्वामी यांनी म्हंटलं.